निगडी ”मॉडेल वॉर्ड” करून दाखविणार – सचिन चिखले

 
एमपीसी न्यूज – अत्यंत गरीब कुटुंब, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. मनसेचे काम करण्यास सुरवात केली. काम करण्याची तळमळ पाहून पक्षाने उमेदवारी दिली आणि सचिन चिखले यांनी नगरसेवक असलेल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा दारुण पराभव करत विजय मिळविला. 
 
प्रभाग क्रमांक 13 निगडी गावठाण, साईनाथनगर, लक्ष्मीनगर, ओटास्कीम प्रभागातून सचिन चिखले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत. 
सचिन चिखले यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)चे काम करण्यास सुरवात केली. 2012 च्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी चिखले या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. सचिन चिखले मनसेच्या विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष होते. सध्या ते पक्षाचे शहराध्यक्ष आहेत.
 
"dipex" 
निगडी प्रभागात मध्यमवर्गीय नागरिक राहत आहेत. प्रभाग मोठा आहे. कोणताही भेदभाव न करता प्रभागाचा सर्वांगीण विकास करणार असून प्रभागातील गुन्हेगारी आटोक्यात आणणार आहे. सुरक्षिततेसाठी संपूर्ण प्रभागात ”सीसीटीव्ही” कॅमेरे बसवणार आहे. वाढदिवस, लग्न कार्यासाठी प्रभागात एक प्रशस्त सभागृह करणार असल्याचे चिखले यांनी सांगितले.  
 
दारुमुक्तीसाठी महिलांना एकत्र करुन मोठा एल्गार करणार असून प्रभाग दारुमुक्त करणार आहे. भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपूल मंजूर झाला आहे. त्याचे काम लवकरात-लवकर सुरु करणार असून पाच वर्षाच्या आत पूर्ण करणार आहे. अकुंश चौकात वारंवार अपघात घडतात. त्या ठिकाणी वाहतूक नियंत्रक दिवा बसविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे चिखले यांनी सांगितले.  

 
प्रभागात महापालिकेच्या दोन शाळा आहेत. त्याची दुरवस्था झाली आहे. सेमी इंग्लिश माध्यमाचे शिक्षण सुरू करणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी मोठे ग्रथांलय सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रभागात सीएसआरचा निधी आणणार आहे. महापालिकेच्या दवाखान्याची दुरावस्था झाली असून रुग्णालयात बेड देखील नाहीत. नागरिकांना कमी खर्चात वैद्यकीय सुविधा देण्यासाठी जेनेरिक मेडिकल स्टोअर सुरू करणार आहे. 
 
ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, क्रीडांगण करणार आहे. खेळाडूंना निधी उपलब्ध करुन देऊन त्यांना प्रोत्साहन देणार असल्याचे नगरसेवक चिखले यांनी सांगितले. 
प्रभागातील नागरिकांना 24 तास पाणीपुरवठा, दररोज कच-याची गाडी प्रभागात आली पाहिजे. कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी जनजागृती करणार आहे. प्रभाग स्वच्छ आणि सुंदर करणार आहे. प्रभाग 13 शहरात ‘मॉडेल वॉर्ड’ करुन दाखविणार असल्याचे चिखले यांनी सांगितले.
 
शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी नागरिकांना सोबत घेऊन  मोठे जनआंदोलन उभारणार असून शास्तीकर संपूर्णपणे माफ करावा, यासाठी प्रयत्न करणार आहे. विरोधात असलो तरी संघर्ष करुन प्रभागासाठी निधी आणणार असून निगडी ”मॉडेल वॉर्ड” करुन दाखविणार असल्याचे, नगरसेवक सचिन चिखले यांनी ”एमपीसी न्यूज”शी बोलताना सांगितले. तसेच विरोधी पक्षाला साजेशी अशी कामगिरी करणार असल्याचेही ते म्हणाले. 
 
शहरात भाजपची लाट होती, मात्र निगडी प्रभागात नागरिकांची लाट होता. नागरिकांनी माझी निवडणूक हाती घेतली होती. भाजपची लाट थोपवून नागरिकांनी माझ्यावर विश्वास टाकून मोठ्या मतांनी निवडून दिले आहे. हा विजय माझा नसून प्रभागातील नागरिकांचा आहे, अशा भावना चिखले यांनी व्यक्त केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.