तबला, ड्रम्स, काहोन या तालवाद्यांचा अप्रतिम कलाविष्कार


शुद्धनाद संस्थेतर्फे छोटेखानी मैफल; वादनासह गायनमैफलीचा घेतला आस्वाद

एमपीसी न्यूज – तबला, ड्रम्स आणि काहोन या तालवाद्यांचा अप्रतिम कलाविष्कार… तीन वाद्यांचा एकत्रितपणे सादर झालेला तालबद्ध समन्वय… तालवादनात ऐकण्यात रममाण झालेले रसिक… अशा तबला, ड्रम्स, काहोन या वाद्यांची अनोखी जुगलबंदी रसिकांनी अनुभवली. आशय कुलकर्णी (तबला), उमेश वारभुवन (काहोन), अभिषेक भुरुक (ड्रम्स) या तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या शिष्यांनी केलेल्या तालवाद्याच्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली. तसेच लतेश पिंपळघरे यांच्या गायनाची अनुभूती रसिकांनी घेतली.

शुद्धनाद संस्थेतर्फे सदाशिव पेठेत राजाराम मंडळाजवळील सभागृहात 22 व्या छोटेखानी मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. नवोदित कलाकारांना आपली कला रसिकांसमोर सादर करता यावी, यासाठी प्रत्येक महिन्यात मैफलीचे आयोजन करण्यात येते. यावेळी आशय कुलकर्णी (तबला), उमेश वारभुवन (काहोन), अभिषेक भुरुक (ड्रम्स), लतेश पिंपळघरे (गायन) यांनी आपली कला रसिकांसमोर सादर केली. शुद्धनाद संस्थेचे संस्थापक अश्विन गोडबोले, अनुप कुलथे, कपिल जगताप उपस्थित होते.

मैफलीच्या पहिल्या सत्राची सुरुवात खंड चापू तालाच्या वादनाने झाली. तबला, ड्रम्स आणि काहोन या तिनही वाद्यांचा बाज वेगळा असला तरीदेखील या वाद्यांच्या एकत्रित सादरीकरणातून मैफलीत बहार आली. स्वानंद कुलकर्णी (संवादिनी) आणि तेजस माजगावकर (टाळ) यांनी तालवाद्यांना अप्रतिम साथ दिली.

मैफलीच्या दुस-या सत्रात लतेश पिंपळघरे यांनी जोगकंस रागाने सुरुवात केली. काहे गुमान करे अपनेको पहचान… या बंदिशीने रसिकांची वाहवा मिळविली. जगत ये समझे सपना… पीर पराई जाने नहीं… या बंदिशींनी रसिकांची विशेष दाद मिळविली. यानंतर मोहनकंस रागातील बंदिशींनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. भैरवी रागातील बंदिशीने मैफलीची सांगता झाली.

अश्विन गोडबोले म्हणाले की, शुद्धनाद हा उभरत्या कलाकारांसाठी असलेला एक खुला मंच आहे, जिथे कलाकार आपली कला रसिकांसमोर सादर करू शकतात. कलाकार आणि श्रोता यांच्यामध्ये असलेले अंतर कमी व्हावे, या उद्देशाने ही मासिक सभा 22 महिन्यांपासून आयोजित केली जात आहे. कलाकारांसाठी कलाकारांची कलाकारांनी सुरू केलेली मैफल म्हणजे शुद्धनाद. गायनाला आशय कुलकर्णी (तबला), अभिनय रवंदे (संवादिनी) यांनी साथसंगत केली. रिवाच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.