राजस्थानमधील पुरग्रस्त गोवंशाला मिळावा पुणेकरांचा मदतीचा हात


श्रीपथमेडा गोवंश आपत्ती निर्मूलन समितीचे, पुणेचे नागरिकांना आवाहन ; मदतीचा ओघ सुरू 

एमपीसी न्यूज – राजस्थानमधील पथमेडा येथील गोशाळांमध्ये पुराच्या पाण्याने गेल्या काही दिवसांपासून थैमान घातले आहे. यामुळे अभूतपूर्व संकटमय परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथील गोशाळा पाण्याखाली गेल्या असून 500 हून अधिक गोवंश मृत्युमुखी पडला आहे. पथमेडा येथे 1 लाख 65 हजार गोवंश विविध ठिकाणी असलेल्या 52 केंद्रांमध्ये सांभाळला जातो. या सर्व केंद्रांना बसलेला तडाखा व पूरग्रस्त परिस्थिती निर्मूलन करण्याकरीता स्थानिक कार्यकर्ते सरसावले आहेत. परंतु हे बळ कमी पडत असून पुणेकरांनी देखील गोवंश बचावाकरीता मदतीचा हात द्यावा, असे आवाहन श्रीपथमेडा गोवंश आपत्ती निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

रविवार पेठेतील श्रीलक्ष्मीनारायण मंदिर येथे पुण्यातील गोप्रेमींची तातडीची बैठक समितीतर्फे आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्वामी श्वेतदीपप्रभू, पुरुषोत्तम लढ्ढा, ललित भट्टड, मिलींद एकबोटे, विक्रम मुरकुटे, प्रल्हाद सायकर, गोविंद राठी आदी उपस्थित होते. पथमेडातील गोशाळांना मदत करण्यासाठी मो. 9373344422, 9767755992 या क्रमांकावर किंवा टिळक रोड व्हाईट हाऊस येथील संस्थेच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे यावेळी सांगण्यात आले. 

स्वामी श्वेतदीपप्रभू म्हणाले की, एवढया मोठया संख्येतील गोवंशाकरीता साठविलेल्या चा-याचे आणि पशुखाद्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे गायींना सतत पाण्यामध्ये रहावे लागलेल्या आजारी पडलेल्या हजारो गोवंशांची शुश्रूषा सुरु आहे. त्यांचा जीव वाचविण्यासाठी विविध औषधांची आवश्यकता आहे. गोरक्षा हे आपले सर्वांचे कर्तव्य असून पुणेकरांनी मदतीचा हात दिल्यास गोशाळांना मोलाची मदत मिळणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी शक्य त्या पद्धतीने सहभाग घ्यावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.