कुदळवाडीत पुन्हा अग्नीतांडव, भंगारमालाची 25 दुकाने भस्मसात

आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू

 

एमपीसी न्यूज – चिखली कुदळवाडी येथे काल (रविवारी) मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत भंगारमालाची सुमारे 25 दुकाने जळून खाक झाला. अग्निशामक दलाचे 15 बंब आगीवर नियंत्रण मिळवण्यासासठी प्रयत्न करीत आहेत. आग पूर्ण विझण्यास किमान एक दिवस लागेल, असा अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

कुदळवाडी येथील विसावा चौकातील भंगारमालाच्या एका दुकानाला रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आग लागली. प्लास्टिक व अन्य ज्वलनशील वस्तू असल्याने आग भडकली आणि आजूबाजूच्या दुकानांनीही पेट घेतला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सर्व अग्निशामक बंब घटनास्थळी पोहोचले. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केलेले असल्याने पुणे, देहूरोड, चाकण तसेच शहरातील खासगी कंपन्यांच्या अग्निशामक बंबांना देखील पाचारण करण्यात आले. 15 बंब आणि टँकर यांच्या मदतीने अग्निशामक दलाने रात्रभर आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. आग कमी झाली असली तरी देखील अजूनही धुमसतच आहे.

 

आगीमुळे परिसरात धुराचे लोळ पसरले असून त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे

 

अपघात की घातपात?

कुदळवाडी येथील भंगारमालाच्या दुकानाला आग लागली नसून लावण्यात आली असावी, असा संशय अग्निशामक अधिकाऱ्यांना आहे. आगीची खबर उशिरा मिळाली आणि अग्निशामक बंब पोहोचेपर्यंत ती खूपच भडकलेली होती. त्यामुळे ही आग लावली गेली असण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे ते  म्हणाले.

या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे अथवा कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. मात्र, या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे.

""

""

""

""

""

""

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.