PCMC : तीन नद्यांमधील जलपर्णी काढण्यासाठी 4 कोटींचा खर्च; मूळ निविदेपेक्षा 30 लाख अधिकचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी या तीन नदी पात्रातील जलपर्णी काढण्यासाठी 4 कोटी 10 लाख 43 हजार 216 रुपयांचा खर्च येणार आहे. सहा महिने कालावधीत जलपर्णी काढण्याच्या या कामाची सहा पॅकेजमध्ये विभागणी करण्यात आली. प्रत्येक पॅकेजसाठी 68 लाख 40 हजार 536 रुपये खर्च येणार आहे. (PCMC) दरम्यान, या कामाची मूळ निविदा रक्कम 3 कोटी 80 लाख 6 हजार 496  रूपये होती. निविदा रकमेपेक्षा 7.99 टक्के जादा दराच्या निविदा स्वीकारल्या आहेत. त्यामुळे मूळ निविदेपेक्षा जास्तीचे 30 लाख 36 हजार रुपये खर्च होणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आज (मंगळवारी) मान्यता दिली.

पिंपरी – चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. पवना नदीचे पात्र 24 किलो मीटर, इंद्रायणीचे 19 आणि मुळा नदीचे 10 किलो मीटर आहे. या नदीपात्रांमध्ये जलपर्णी वाढली. या जलपर्णी काढून नदीपात्र नियमितपणे स्वच्छ ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी महापालिकेमार्फत या तीनही नदी पात्रातील जलपर्णी काढण्यासाठी निविदा मागविण्यात येतात. या तीन नद्यांमधील जलपर्णी काढण्यासाठी शहरातील नद्यांची सहा पॅकेजमध्ये विभागणी करून जलपर्णी काढण्याचे कामकाज 2020-21 मध्ये करण्यात आले होते. त्यावेळी संपूर्ण इंद्रायणी आणि मुळा नदीकरिता प्रत्येकी एक पॅकेज आणि पवना नदीकरिता चार पॅकेज अशा प्रकारे एकूण सहा निविदा करण्यात आल्या होत्या.

Pimpri News : नागरिकांनो सावध रहा, पोलिसांना सहकार्य करा, एकत्र मिळून गुन्हे आटोक्यात आणू – पोलीस आयुक्त

हा कालावधी संपुष्टात आल्याने महापालिकेने पुन्हा निविदा मागविल्या होत्या. नवीन निविदा प्रक्रीयेमध्ये सहाच पॅकेज ठेवण्यात आले मात्र, कामात बदल करण्यात आला आहे.(PCMC) पवना नदीकरिता पूर्वी चार पॅकेज होते. ते आता दोनच ठेवण्यात आले आहेत. इंद्रायणी नदीसाठी पूर्वी एकच पॅकेज होते. ते आता दोनमध्ये विभागण्यात आले आहे. मुळा नदीकरिता एकच पॅकेज असून पवना व मुळा या दोन नद्यांसाठी एकत्रित एक अशी सहा पॅकेजची विभागणी करण्यात आली आहे.

पहिल्या पॅकेजमध्ये पवना नदीतील सांगवडे ते मोरया गोसावी बंधारा या एकूण 9.96 किलोमीटर क्षेत्रातील जलपर्णी काढण्यात येणार आहे. पॅकेज दोन अंतर्गत पवना नदीपात्रातील मोरया गोसावी बंधारा ते कासारवाडी दत्त मंदीर (सृष्टी चौक, पिंपळे-गुरव ब्रीज) या 9.67 किलोमीटर क्षेत्रातील जलपर्णी काढण्यात येणार आहे. तिसर्‍या पॅकेजमध्ये पवना व मुळा नदीपात्रातील कासारवाडी दत्त मंदीर (सृष्टी चौक, पिंपळे-गुरव ब्रीज) ते बोपखेल बंधारा या 9.67 किलोमीटर अंतरातील जलपर्णी काढली जाणार आहे.

चौथ्या पॅकेजअंतर्गत मुळा नदीपात्रातील वाकड ब्रीज सुर्या हॉस्पीटल ते दापोडी पवना-मुळा संगम या 10.30 किलोमीटर क्षेत्रातील जलपर्णी काढण्यात येणार आहे. (PCMC) पॅकेज पाच अंतर्गत इंद्रायणी नदीतील तळवडे येथील सिंटेल कंपनी ते बटवाल वस्ती, मोशी बंधारा या 10.55 किलोमीटर अंतरातील जलपर्णी काढली जाणार आहे. पॅकेज सहा अंतर्गत इंद्रायणी नदीतील बटवाल वस्ती, मोशी बंधारा ते हिरामाता मंदीर, चर्‍होली एसटीपी प्रकल्प या 9.48 किलोमीटर क्षेत्रातील जलपर्णी काढण्यात येणार आहे. प्रत्येक पॅकेजसाठी 68 लाख 40 हजार 536 रुपये खर्च येणार आहे.

पॅकेज  – 1
निविदा रक्कम – 63 लाख 34 हजार 416
पात्र निविदा – 4
ठेकेदाराचा अंतिम दर – 7.99 टक्के जास्त
मंजूर निविदा रक्कम – 68 लाख 40 हजार 536
ठेकेदाराचे नाव – मे. शुभम उद्योग
….

पॅकेज – 2
निविदा रक्कम – 63 लाख 34 हजार 416
पात्र निविदा – 5
ठेकेदाराचा अंतिम दर – 7.99 टक्के जास्त
मंजूर निविदा रक्कम – 68 लाख 40 हजार 536
ठेकेदाराचे नाव – मे. शुभम उद्योग
….
पॅकेज – 3
निविदा रक्कम – 63 लाख 34 हजार 416
पात्र निविदा – 4
ठेकेदाराचा अंतिम दर – 7.99 टक्के जास्त
मंजूर निविदा रक्कम – 68 लाख 40 हजार 536
ठेकेदाराचे नाव – मे. तावरे फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्विसेस प्रा. लि
….

पॅकेज – 4
निविदा रक्कम – 63 लाख 34 हजार 416
पात्र निविदा – 3
ठेकेदाराचा अंतिम दर – 7.99 टक्के जास्त
मंजूर निविदा रक्कम – 68 लाख 40 हजार 536
ठेकेदाराचे नाव – मे. वैष्णवी एंटरप्रायजेस
…..

पॅकेज – 5
निविदा रक्कम – 63 लाख 34 हजार 416
पात्र निविदा – 3
ठेकेदाराचा अंतिम दर – 7.99 टक्के जास्त
मंजूर निविदा रक्कम – 68 लाख 40 हजार 536
ठेकेदाराचे नाव – मे. सैनिक इंटेलिजन्स
….

पॅकेज – 6
निविदा रक्कम – 63 लाख 34 हजार 416
पात्र निविदा – 3
ठेकेदाराचा अंतिम दर – 7.99 टक्के जास्त
मंजूर निविदा रक्कम – 68 लाख 40 हजार 536
ठेकेदाराचे नाव – मे. बापदेव महाराज स्वयंरोजगार संस्था

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.