Pune : भाजपचा पारदर्शक कारभार चव्हाट्यावर ; माजी नगरसेवकाच्या भावासाठी नियम बसवले धाब्यावर

एमपीसी न्यूज- केवळ भाजपच्या माजी नगरसेवकाचा भाऊ या ‘निकषावर’वर नियम धाब्यावर बसवून उपमुख्य लेखापरीक्षकपदी बढती देण्याच्या प्रस्तावाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध केला, पण बहुमताच्या जोरावर भाजपने हा प्रस्ताव मंजूर केला. प्रशासनाने नकारात्मक अभिप्राय दिलेला असताही आणि कोणत्याही शैक्षणिक पात्रतेची पूर्तता न करणा-याला बहुमताच्या जोरावर बढती देणे हाच का भाजपचा पारदर्शी कारभार ? असा सवाल केला जात आहे.

महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक कार्यालयाकडील उपमुख्य लेखापरीक्षक जागेवर सूर्यकांत राजाराम काळे यांना बढती देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला होता. काळे यांच्या बढतीवर आक्षेप घेत हा विषय न्यायप्रविष्ट असताना असा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत आला कसा ? असा प्रश्न काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी विचारला. काळे यांच्या अगोदर दोन अधिकारी वरिष्ठ असतानाही त्यांना बढती देण्याची शिफारस खात्याने कशी केली ? असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला. यावर खुलासा करताना मुख्य लेखापरीक्षक अंबरीश गालिंदे म्हणाले, “काळे यांना बढती देता येणार नाही, असा नकारात्मक अभिप्राय देण्यात आला आहे, तसेच या पदासाठी ठेवण्यात आलेल्या निकषांमध्येही काळे बसत नसल्याचे स्थायी समितीच्या निदर्शनास आणून दिल्याचे गालिंदे यांनी सांगितले. मात्र, स्थायी समितीने त्यांच्या अधिकारात काळे यांच्या नावाची शिफारस केल्याने हा विषय आल्याचेही गालिंदे म्हणाले.

या पदाच्या पात्रतेमध्ये काळे बसत नसताना केवळ भाजपच्या माजी नगरसेवकांचा भाऊ असल्याने ही बढती दिली जात आहे का ? असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. यावर विरोधकांचा वाढता आक्षेप पाहता यावर मतदान घेण्याचे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी दिले. ६३ विरुद्ध २४ असे मतदान झाले. त्यामुळे हा प्रस्ताव भाजपने मंजूर केला. यावेळी शिवसेना मात्र तटस्थ राहिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.