Pune : मुठा कालवा दुर्घटनेतील बाधितांना भाऊ रंगारी मंडळातर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

एमपीसी न्यूज- मुठा उजवा कालवा फुटून पाण्याच्या प्रवाहात गुरुवारी (दि. 27) दांडेकर पूल येथील जनता वसाहतीमधील घरे वाहून गेली. त्यामुळे येथील नागरिकांचे संसार उघड्यावर पडले. भाऊ रंगारी मंडळातर्फे येथील नागरिकांना आज, शनिवारी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या वस्तूंमध्ये प्रामुख्याने 200 चादरी, 200 बेडशीट्स आणि 300 टॉवेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता, ह्या वस्तूंचे वितरण दांडेकर पुलानजीक ट्रस्टच्या सेवाभावी कार्यकर्त्यांमार्फत करण्यात आले. याप्रसंगी नागरिकांना अडचणीतून बाहेर येण्यासाठी त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

या मदतकार्यात अविनाश रायरीकर, दीपक गायकवाड आणि अविनाश खंडारे यांच्यासोबत सुरज रेणुसे, बाळासाहेब निकम, राजेंद्र गुप्ता, ओंकार उरूनकर, अमर निकम, प्रतीक जावळे इत्यादी कार्यकर्ते व विश्वस्त सहभागी झाले होते. सदर मदतकार्याचे नियोजन परेश खांडके आणि दत्तात्रय माने यांनी केले.

पुण्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कॅनॉलग्रस्त नागरिकांचे घर आणि संसार पुन्हा नव्याने उभारणीसाठी स्वयंपाकाची भांडी आणि इतर उपयोगी वस्तू साहित्य मदत स्वरूपात देऊन सार्वजनिक गणेशोत्सवाला सामाजिक जाणिवेचे व्यासपीठ निर्माण करण्यास हातभार लावावा असे आवाहन श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.