Hinjawadi : दुचाकीस्वाराने हिसकावले सव्वा लाखाचे मंगळसूत्र

एमपीसी न्यूज – शतपावलीसाठी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोन्याची चेन असा एक लाख 20 हजारांचा ऐवज हिसकावून नेला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास बावधन येथील युनिकस सोसायटी समोर घडली.

सरिता दत्तात्रय कुलकर्णी (वय 60, रा. एमएलडी गार्डन जवळ, मराठा मंदिर मागे, बावधन) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मोटारसायकल वरील अज्ञात दोन इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सरिता आणि त्यांचे पती बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शतपावलीसाठी गेले. बावधन मधील एमएलडी चौकात युनिकस सोसायटी समोर दोनजण दुचाकीवर थांबले होते. सरिता आणि त्यांचे पती चालत येताना दिसले असता आरोपींनी त्यांची दुचाकी सरिता आणि त्यांचे पती यांच्यामध्ये घातली. दुचाकीवर मागे बसलेल्या एका इसमाने सरिता यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोन्याची चेन असा एकूण एक लाख 20 लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.