Chakan : मृत अर्भकाची होणार डीएनए चाचणी ; पाईट येथील गतिमंद युवतीवरील बलात्कार प्रकरण

आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज- खेड तालुक्यातील पाईट येथील एका तेवीस मुलीवर गतिमंद असल्याचा गैरफायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना संबंधित गरोदर गतिमंद तरुणीचा बाळांतपणा दरम्यान मृत्यू झाल्यानंतर उघडकीस आली आहे. आदिवासी ठकार समाजातील युवतीवर झालेल्या अन्यायकारक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पिडीतेच्या आईने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर मंगळवारी (दि.9) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील खऱ्या आरोपीचा छडा लावण्यासाठी चाकण पोलिसांनी मृत अर्भकाच्या डीएनए चाचण्या करून त्यामाध्यमातून आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न चालविला आहे.

पाईट येथील माळवाडीच्या आदिवासी पाड्यावरील ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर चाकण पोलिसांनी हे कृत्य कोणी केले याचा शोध सुरु केला असून हा घृणास्पद प्रकारात नेमका कुणाचा किंवा किती जणांचा सहभाग आहे याचा तपास पोलीस करीत आहेत. चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी सांगितले की, खेड तालुक्यातील पाईट भागातील एका आदिवासी ठाकर वस्तीवरील तेवीस वर्षीय तरुणी गतिमंद असल्याचा गैरफायदा घेऊन कोणीतरी अज्ञात इसमाने तिचे सोबत शारिरिक संबंध ठेवल्याने ती 9 महिन्यांची गरोदर राहिली.

तिला राहत्या घरी त्रास होऊ लागल्याने औषध उपचारासाठी पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 23 मार्च रोजी पहाटे साडेपाचचे सुमारास तिने एका मृत स्त्री अर्भकास जन्म दिला. त्यानंतर पिडीत गतिमंद तरुणीवर औषध उपचार सुरु असताना 6 एप्रिल रोजी दुपारी तीनच्या सुमारास तिचाही मृत्यू झाला. पिडीतेच्या आईच्या फिर्यादीवरून अज्ञातावर भा.दं.वि. कलम 376 (ल) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या घटनेतील आरोपींचा माग काढण्यासाठी मृत अर्भकाच्या डीएनए चाचणी वरून आरोपींना शोधून काढण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.