Pimpri : उमलण्याआधीच खुडली जातीय कळी, चुका लपवण्यासाठी दिला जातोय नात्यांचा बळी

अल्पवयीन मुली, महिलांवर बलात्कार आणि बेकायदेशीर गर्भपाताचे प्रमाण वाढतंय

(श्रीपाद शिंदे)

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुली, महिलांवर लैंगिक अत्याचार करून गर्भधारणा झाल्यानंतर बेकायदेशीर गर्भपात करण्याचे प्रमाण वाढत आहे. बहुतांश प्रकार कोवळ्या वयात झालेल्या अनैतिक संबंधातून होत आहेत. प्रेमाच्या नावाखाली अनैतिक संबंध ठेवायचे आणि त्यातून झालेली गर्भधारणा घरच्यांना समजू नये म्हणून परस्पर गर्भपात करायचे. गर्भपात झाल्यानंतर ते अर्भक उघड्यावर, आडबाजूला कुठेही टाकून द्यायचं. हे प्रकार मागील काही दिवसांमध्ये वाढत आहे. जगाच्या बागेत ही कोवळी फुले उमलण्याआधीच खुडली जात आहेत. यानिमित्ताने स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणा-या समाजाची ही काळी बाजू समोर येत आहे. स्वतःच्या चुका लपवण्यासाठी नात्यांचा बळी दिला जातोय हे या भरकटलेल्या तरुण पिढीला समजत नाही.

शाळेमध्ये असताना सोशल मीडियाच्या विकृत आकर्षणामुळे एकमेकांच्या सोबत यायचं. लहान वयात मोबाईल हातात येतो. ज्या वयात जे बघायला नको त्या गोष्टी बघायला मिळतात. त्यामुळे मने भरकटली जातात. शाळा-कॉलेजात, कामावर जाता-येता मुला-मुलींशी मैत्री करायची. काही दिवसानंतर या मैत्रीचं रूपांतर प्रेमात करायचं. प्रेमात पडल्यानंतर ‘साथ जियेंगे, साथ मरेंगे’ अशा प्रकारच्या आणाभाका घ्यायच्या. स्वतःची स्वतःबद्दलची जबाबदारी, भविष्याचा विचार न करता प्रेमाच्या डोहात बुडून जायचं. याच प्रेमाच्या नावाखाली लहान वयात एकमेकांच्या शरीराचे आकर्षण वाटू लागते. त्यातून वयाच्या चौदाव्या, पंधराव्या वर्षातही गर्भधारणा होते. शाळेतच असे प्रकार घडतात असे नाही. समाजात सर्वत्र याचे लोण पसरले आहे. प्रेमाला वयाची अट नाही. पण ते निभावण्यासाठी तेवढं शहाणपण नक्कीच गरजेचं आहे.

गर्भधारणा झाल्याचे लक्षात येताच प्रेमाच्या होडीत बसून शरीरसुखाच्या सागरात बुडणारे ताडकन एका क्षणात किना-यावर येतात. मग सगळ्या जबाबदा-या, घरच्यांची मते यांचा विचार केला जातो. बहुतांश वेळेला हे प्रकरण घरी जाऊ नये म्हणून जीवाशी खेळून गर्भपात केला जातो. मातृत्वाचा भार आपण पेलू शकत नसल्याचे जाणवताच कोवळे अर्भक रस्त्यावर, कच-यात, नदी किनारी, बसस्टॉपवर असे कुठेही फेकून दिले जाते. आपल्या शरीराचा अंश आपण फेकून देत आहोत, याची पुसटशी कल्पना देखील या तरुणांना येत नाही. अशा हैवानी मानसिकतेला मातृत्व तरी म्हणावे का ? हा एक प्रश्न आहे.

प्रत्येक प्रेमी युगुल प्रेमाच्या आणाभाका घेऊन लग्न करण्याची स्वप्ने पाहते. त्या स्वप्नाच्या नादामध्ये नको ती चूक करून बसते. पुढे गर्भधारणा झाल्यानंतर दोघांमध्ये भांडण सुरु होते. लग्न न करण्याचाही विचार अनेकदा होतो. घरच्यांना समजताच ही प्रकरणे पोलीस ठाण्यात पोहोचतात. ज्यांच्यासोबत सात जन्माची स्वप्ने बघितली जातात. त्याला स्वतःहून तुरुंगाच्या रस्त्यावर लोटले जाते. यामध्ये फक्त तरुणपिढीला दोष देणे योग्य ठरणार नाही. आपल्या मुलाकडून किंवा विशेषतः मुलीकडून घडलेल्या चुकीवर पालकांकडून पांघरून घातले जाते. मुलीचे आयुष्य बरबाद होऊ नये, कुटुंबाची बदनामी होऊ नये यासाठी मग गुपचूपपणे मुलीने जन्माला घातलेल्या कोवळ्या जीवाला वाऱ्यावर सोडून देण्याचे पातक घडते. यात चूक कोणाची हा प्रकरणपरत्वे तपासण्याचा विषय आहे. पण वस्तुस्थिती मात्र इथेच येऊन थांबते.

देहूरोड येथे एका तरुणाचे एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध जुळले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, दोघांमध्ये शरीरसंबंध झाले आणि मुलीला गर्भधारणा झाली. त्यानंतर तरुणाने मुलीकडे पाठ फिरवली. तिला कसल्यातरी गोळ्या चारून गर्भपात करण्यास सांगितले. मुलीने गर्भपात केला आणि गर्भ अक्षरशः शौचालयात फेकून दिला. मुलीने देहूरोड पोलीस ठाण्यात मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला. प्रेम हे विश्वास, साथ, त्याग-समर्पण यांचं प्रतीक आहे. अपत्य होणं म्हणजे दोघांच्यामधील विश्वास वाढीस लागणं, जबाबदा-या पेलण्याची ताकद येणं, कौतुक आणि आनंद म्हणून याकडं पाहिलं जातं. ज्या प्रेमाचं लेबल लावून हा सगळा प्रकार होतो. त्याला प्रेम म्हणावं का ? स्वतःच्या चुका लपवण्यासाठी नात्यांचा बळी योग्य आहे का ? यासाठी पालकांची जबाबदारी कुठे कमी पडतेय ? समाजाने यात काय भूमिका घ्यायला हवी ? हे आणि असे अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत.

पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील म्हणाल्या, “लोकांची मानसिकता खालावत आहे. खालावलेल्या मानसिकतेतून हे प्रकार घडत आहेत. अर्भकांना आडबाजूला फेकून दिलं जातं. माणूस म्हणून त्या अर्भकाला देखील जगण्याचा हक्क आहे. तो हक्क आपण हिरावून घेऊ शकत नाही. हा गंभीर गुन्हा आहे”

  • गर्भपात आणि अर्भक सापडण्याच्या काही घटना –

# 17 नोव्हेंबर 2017 – केळगाव मधील हनुमानवाडी येथे एका तलावाजवळ असलेल्या पाऊलवाटेच्या बाजूला एका झुडुपात दोन ते तीन महिन्याचे स्त्री जातीचे अर्भक आढळले. अति रडल्याने अर्भकाचा अंतर्गत आघात आणि मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला होता. न सांभाळण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत तब्बल एक वर्षानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

# 9 फेब्रुवारी 2019 – बापाने पोटची मुलगी सहा महिन्यांची गरोदर असताना तिच्यावर दबाव आणून तिचा गर्भपात केला. गर्भपातानंतर गर्भाची परस्पर विल्हेवाट लावली. जावयाने याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

# 10 फेब्रुवारी 2019 – चिंचवड मधील धनेश्वर पुलाजवळ एका सिमेंटच्या पोत्यामध्ये स्त्री जातीचे अर्भक मिळाले. पुलाजवळ खूप दुर्गंधी सुटल्याने एका नागरिकाने पोते उचकटून बघितले असता हा प्रकार समोर आला.

# 25 मे 2019 – निगडी येथे तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापित केला. तरुणीचा तिच्या इच्छेविरोधात दोनदा गर्भपात केला.

# 10 जून 2019 – मावळ तालुक्यातील शिरगाव येथे मारुती मंदिराजवळ बस स्टॉपवर 25 ते 30 दिवसांचे बाळ सापडले. पावसाच्या तडाख्यानंतर वातावरण शांत झाले. या शांत वातावरणाला चिरत एका कोवळ्या जीवाचा आवाज येऊ लागला. बस स्टॉपवर साचलेल्या पाण्यात एका पातळ कपड्यात एक बाळ रडत होते. त्याच्या पालकांनी त्याला पडत्या पावसात सोडून दिले. स्थानिकांनी याबाबत तळेगाव पोलीस ठाण्यात माहिती देत बाळाला रुग्णालयात दाखल केले.

# 17 जून 2019 – लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. त्यात तिची गर्भधारणा झाली. तरुणीने लग्नासाठी तरुणाच्या घऱच्यांकडे धाव घेतली. मात्र तो प्रयत्न निष्फळ झाला. दरम्यान तरुणीने गर्भपात केला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे.

# 18 जून 2019 – अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केला. मुलगी गरोदर राहिल्यानंतर तरुणाने तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला. हा गर्भ देहूरोड येथे महिलांच्या शौचालयात आढळला.

# 18 जून 2019 – चाकण येथे इंद्रायणी नदीच्या किनारी एका पुलाजवळ तीन ते चार दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक सापडले. हे अर्भक कापडी फडक्यात गुंडाळून पुलाजवळ उघड्यावर ठेवले होते.

या आणि अशा अनेक घटनांमुळे समाजातील एक दाहक वास्तव समोर येत आहे. या घटनांमधून फक्त कोवळ्या जीवाचा बळी दिला जात नाही तर नात्यालाही तिलांजली दिली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.