Maval : मावळात सुरु असलेल्या बोगस बांधकाम कामगार नोंदीची चौकशी करा

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने मावळ तालुक्यात सध्या सुरु असलेल्या बांधकाम कामगारांच्या नोंदीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून सर्वसामान्य बांधकाम कामगारांसोबत सधन घरातील नागरिक व राजकिय पदाधिकारी कार्यकर्ते यांना लाभ देण्यात आला आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस आयचे माजी पुणे जिल्हा सरचिटणीस डाॅ. किरण गायकवाड यांनी कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत किरण गायकवाड यांनी म्हटले आहे की, बांधकाम मजूर व इतर 21 प्रकारच्या कामगारांच्या नोंदी करत त्यांना लाभ देण्याची शासकिय योजना कौतुकास्पद आहे. मावळ तालुक्यात तब्बल 11 हजारांहून अधिक नागरिकांना या योजनेचा लाभ देत त्यांच्या खात्यावर 5 हजार रुपये रोख व बांधकाम साहित्य वाटप करण्यात आले आहे. गोरगरिबांना लाभ मिळणे न्यायिक असले तरी मावळ तालुक्यात 11 हजार बांधकाम मजूर आले कोठून याचा शोध घेणे गरजेचे आहे.

लाभार्थी मजुरांच्या ऐवजी अनेक राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या नोंदी करत त्यांना लाभ देण्यात आला आहे. अनेक सधन घरातील नागरिकांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. योजनेचा लाभ बोगस लाभार्थी घेत असून जनतेचा कररुपी पैसा हा भ्रष्ट मार्गाने खर्च होत असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.

बाळा भेगडे हे कामगार राज्यमंत्री असल्याने व त्यांच्याच तालुक्यात हा प्रकार घडत असल्याने त्यांनी त्वरित या प्रकरणाची व गैरव्यवहाराची माहिती घेऊन बोगस लाभार्थी व त्यांना लाभ मिळवून देणारे बोगस नोंदणी अधिकारी यांच्यावर कारवाई करत लाभाची रक्कम सरकार दरबारी जमा करावी अशी मागणी किरण गायकवाड यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.