Pune : ‘भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेचे राष्ट्रीय स्मारक व्हावे’

महामशाल मोर्चाव्दारे फुले विचार समर्थकांची मागणी

एमपीसी न्यूज – महात्मा फुले आणि सावित्रीबाई  फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी १८४८ साली भिडे वाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली. ही शाळा म्हणजे भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक करावे, या मागणीसाठी सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती आणि युवा माळी संघ यांच्यावतीने आज फुलेवाडा ते भिडेवाडा या मार्गावर महामशाल मोर्चा काढण्यात आला. फुले विचारांच्या हजारो समर्थकांनी या महामशाल मोर्चामध्ये सहभागी होऊन आपली मागणी मांडली.
या महामशाल मोर्चामध्ये महात्मा फुले वसतिगृह कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष दिपक जगताप, माजी आमदार कमलताई ढोले- पाटील, महामशाल मोर्चाचे मुख्य समन्वयक कल्याण जाधव, तसेच युवा माळी संघाच्या महिला अध्यक्षा आणि ओबीसी महासभेच्या महिला अध्यक्षा सुनीता भगत, युवा माळी संघाच्या चिटणीस वृषाली शिंदे, अमर हजारे, छाया भगत, सतीश गायकवाड, अरुण हरकळ, देवरा जाळे आदी मान्यवरांसह फुले विचारांचे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या महामशाल मोर्चाचा प्रारंभ महात्मा फुले वाडा, गंजपेठ येथून झाला. त्यानंतर लोहियानगर कमान, रामोशी गेट जुनी पोलीस चौकी, ए. डी. कॅम्प चौक, संत कबीर चौक,  अल्पना टॉकीज, डूल्या मारुती चौक, हमजेखान चौक, सोन्या मारुती चौक, मोती चौक, पासोडया विठोबा मंदिर, बुधवार पेठ  चौक, येथून भिडेवाडा, पहिली मुलींची शाळा येथे या महामशाल मोर्चाचा समारोप झाला.
यावेळी बोलताना माजी आमदार कमलताई ढोले- पाटील म्हणाल्या की, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी १८४८ साली भिडे वाडा येथे मुलींची पहिली शाळा, म्हणजे भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक व्हावे म्हणून अखंड महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेरच्या राज्यातही ‘सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती’च्या वतीने मागील दोन वर्षांपासून सातत्यपूर्ण आंदोलन आणि उपोषण करून सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या शाळेचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, या मागणीसाठी अनेक व्यक्ती आणि संस्था विविध मार्गांनी प्रयत्न करीत आहेत. मात्र, शासकीय पातळीवर या मागण्यांना कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. शासनाने यासाठी भरघोस तरतूद करून भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक घोषित करून ते जतन करावे, अशी आमची मागणी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.