Pimpri : महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उद्यापासून पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्व

विविध कार्यक्रमांची मेजवानी 

एमपीसी न्यूज – क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी – चिंचवड शहरातील (Pimpri) रसिकांना 11 ते 15 एप्रिल या कालावधीत सांगितिक आणि वैचारिक मेजवानीचा आस्वाद लुटता येणार आहे. निमित्त आहे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे.

पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील मैदानात होणार्‍या या प्रबोधन पर्वाचे उद्घाटन मंगळवारी (दि. 11) सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजता शाहीर शितल साठे आणि सचिन माळी यांचे
‘नवयान महाजलसा’ या प्रबोधनात्मक कार्यक्रमाने प्रबोधनपर्वाची सुरुवात होईल. त्यानंतर कुमार आहेर यांचा ‘मी जोतीराव फुले बोलतोय’ हा एकपात्री नाट्यप्रयोग होईल.

गायक राहुल शिंदे आणि विजय सरतापे यांचा गीतगायनाचा कार्यक्रम, राहुल कांबळे यांचा महामानवांच्या गीतांचा अनोखा नजराना सादर होणार आहे. (Pimpri) सायंकाळी पाच वाजता ‘महामानवांना अभिप्रेत समतावादी समाज व्यवस्था आणि चित्रपट माध्यमांची भूमिका’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर, नागराज मंजुळे, अभिनेते सिद्धार्थ जाधव, साहित्यिक डॉ. मिलिंद बागुल आदी
सहभागी होणार आहेत. त्यानंतर डॉ. किशोर वाघ यांचे ‘वामनाचा जत्था’ हा परिवर्तनवादी विचारधारेवर आधारित समाजप्रबोधन कार्यक्रम आणि मैना कोकाटे यांच्या गीतगायनाच्या कार्यक्रम होईल.

बुधवारी  (दि. 12) सकाळी दहा वाजता स्थानिक कलावंतांचे गीतगायन, नागेश गवळी यांचे ‘शिव-फुले-शाहू आंबेडकरांचा क्रांतिकारी लढा’ या विषयावर व्याख्यान, ज्येष्ठ गायक विष्णू शिंदे, सुयोग केदार आणि अश्विन निरभवणे यांचा गीतगायनाचा कार्यक्रम होईल. (Pimpri) सायंकाळी चार वाजता साहित्यिक डॉ. वामन गवई, जर्मनीतील हिंदुस्थानी राजदूत सुयश चव्हाण, जेएनयु दिल्ली येथील डॉ. मिलिंद आव्हाड, दिल्ली विद्यापीठाचे प्रा. लक्ष्मण यादव यांचा सहभाग असलेले ‘रुपयाची समस्या – एक असंबोधित आर्थिक प्रश्न’ या विषयावर चर्चासत्र होईल. त्यानंतर डॉ. अविनाश नाईक व सहकारी यांचे ‘यशोगाथा
महासूर्याची’ हा कार्यक्रम आणि गायक राहुल अन्वीकर यांचा गीतगायनाचा कार्यक्रम होईल.

Rain Forecast : यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

गुरुवारी (दि. 13) सकाळी दहा वाजता स्थानिक कलावंतांचा आणि साडेअकरा वाजता गायक संकल्प गोळे आणि मुन्ना भालेराव यांचा गीतगायनाचा कार्यक्रम, गायक चेतन लोखंडे, मंजुषा शिंदे, शेखर गायकवाड, स्वप्निल पवार यांचा ‘जल्लोष भीमरायाचा’ हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे. शायर माजीद देवंबदी (दिल्ली), शायर वारीस वारसी (मेर’), शायर शरफ नैनपारवी (उत्तरप्रदेश), मोईन शादाब(नवी दिल्ली), अनंत राऊत, नारायण पुरी (महाराष्ट्र) आणि आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कवी कालेनंद यांचा ‘काव्यशायराना’ या कविता आणि शायरीचा अभिनव कार्यक्रम होणार आहे.

त्यानंतर गझल नवाज भीमराव पांचाळे यांचा गझलांचा कार्यक्रम तर साडेसहा वाजता सार्थक शिंदे, दर्शन जावळे, क्रांती शिंदे, उन्नती रायते, चेतना इंगळे, सृजना भगवान सरवदे (सातारा) यांचे ‘हम भीमके दिवाने’ हा कलाविष्कार सादर होणार आहे. बाळू साळवे यांच्या माऊथ ऑर्गन वाद्य सादरीकरणातून महामानवांना अभिवादन होईल. तर, प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे.

शुक्रवारी (दि. 14) सकाळी सहा वाजता नागसेनदादा सावदेकर, कुणाल वराळे, प्रांजल बोधक आणि लक्ष्मी लहाने यांच्या उपस्थितीत धम्मपहाट आणि शाहीर राजेंद्र कांबळे यांच्या शाहिरी जलशाचे आयोजन करण्यात आले आहे. काजल कोथळीकार यांचे ‘ऐका मी रमाई बोलते’ हा एकपात्री प्रयोग, भारतीय बौद्ध महासभा आयोजित वंदना व समता सैनिक दलाची मानवंदना होणार आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

आदिवासी कलानृत्यातून महामानवांना अभिवादन केल्यानंतर गायिका रागिणी-रोहिणी बोदडे यांचे गीतगायन, बालप्रबोधनकार सप्त खंजिरी वादक तुलसी हिरवे यांचे कीर्तनातून प्रबोधन, व्हायोलीन वादक पंडित मिलिंद रायकर यांचे ‘कलर्स ऑफ व्हायोलीन’ हा संगीतमय कार्यक्रम आणि सँड आर्टिस्ट प्रसाद सोनवणे आणि चित्रकार सुमेध कल्हाळीकर यांच्या कलेतून सँड आर्ट व चित्राद्वारे महामानवांना अभिवादन करण्यात येणार आहे.

त्यानंतर गायक विपीन तातड, स्वप्नील गणवीर, श्रावस्ती मोहिते, मंगेश इंगोले आणि बाल रॅपर स्वरूप डांगळे यांचे रॅपसाँग, गायक अनिरुद्ध वनकर यांचा ‘वादळवारा’ हा गीतगायनाचा कार्यक्रम, साजन बेंद्रे, विशाल चव्हाण आणि अभिषेक राजे यांचा ‘महासंगीताचा कलाविष्कार’ होणार आहे.

शनिवारी (दि. 15) सकाळी गायक विशाल ओव्हाळ आणि धिरज वानखेडे तर, गायक धम्मानंद शिरसा’ आणि गायिका संगीत विशारद प्रज्ञा इंगळे यांचे गीतगायन, त्यानंतर ‘कशाला मागं सरायचं ‘हे दोन अंकी नाटक सादर होणार आहे. एच. ए. मैदान – पिंपरी येथे शनिवारी सायंकाळी डॉ. गणेश चंदनशिवे आणि चेतन चोपडे यांचे ‘तुझ्या पाऊल खुणा’ हा महासंगीताचा आंबेडकरी जलसा तर सायंकाळी जतीन पाटील दिग्दर्शित ‘क्रांतिसूर्य’ हे महानाट्य होणार आहे.

दरम्यान,  पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे महापालिका आणि बानाई (डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनीअर्स) यांच्यावतीने 17 ते 19 एप्रिल या कालावधीत बेरोजगारांसाठी  स्वयंरोजगार व उद्योजकांसाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. (Pimpri) 21 एप्रिल रोजी ‘भव्य रोजगार मेळावा’ घेण्यात येणार आहे. या मेळाव्यास विद्यार्थ्यांनी मोठ्या  संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.