Pune : पुण्यात राष्ट्रवादी 4, काँग्रेस 3 तर, 1 जागा मित्र पक्षाला – अजित पवार

आघाडीचेच सरकार आले पाहिजे - कार्यकर्त्यांना सल्ला

एमपीसी न्यूज – पुणे शहरात 4 राष्ट्रवादी, 3 काँग्रेस तर 1 जागा मित्र पक्षाला सोडण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. पर्वती, हडपसर, वडगावशेरी आणि खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादी निवडणूक लढणार आहे. शिवाजीनगर, कसबापेठ, पुणे कॅन्टोन्मेंट काँग्रेस तर कोथरूड विधानसभा मतदारसंघ मित्र पक्षाला सोडण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले. पक्षाच्या विरोधात निगेटिव्ह बोलू नका, सकारात्मक बोला, कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचेच सरकार आले पाहिजे, अशी सूचनाही पवार यांनी केली. भाजपचा केंद्र आणि राज्यातील कारभारावर पवार यांनी सडकून टीका केली. तसेच, शिवसेना-भाजप उमेदवार जाहीर होईपर्यंत काही मतदारसंघात उमेदवार जाहीर करणार नाही. अजून चांगला उमेदवार मिळण्याची वाट बघणार, असल्याचे ते म्हणाले.

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा रविवारी दुपारी अण्णाभाऊ साठे सभागृह बिबवेवाडी येथे आयोजित केला होता. त्यावेळी अजित पवार बोलत होते. शहराध्यक्ष चेतन तुपे, खासदार ऍड. वंदना चव्हाण, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, नेते अमोल मीटकर, माजी महापौर मोहनसिंह राजपाल, दत्ता धनकवडे, माजी आमदार कुमार गोसावी, नगरसेवक बाबुराव चांदेरे, सुभाष जगताप, गणेश ढोरे, महेंद्र पठारे, भगवान वैराट, महेश शिंदे, बंडू गायकवाड, विशाल तांबे, रवींद्र माळवदकर, सुरेश घुले, प्रवक्ते अंकुश काकडे उपस्थित होते. यावेळी करमाळा आणि वडगावशेरी, धानोरी भागातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, आठही मतदारसंघात काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी असेल. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. 2014 ची आश्वासने मोदी यांनी पाळले नाही. राज्यात महिलांवर अत्याचार वाढलेत. उद्योग बाहेर जात आहेत. या निवडणुकीत आपल्याला चांगले काम करायचे आहे. 100 टक्के निवडणुकीत चांगले काम करू. जो कोणीही उमेदवार असेल त्याला निवडून आणू, असा निर्धार त्यांनी यावेळी केला.

अमोल मिटकर म्हणाले, राष्ट्रवादीत जेवढी तरुणांची संख्या आहे. तेवढी शिवसेना – भाजपात नाही. 2014 ते 2019 या कालावधीत जातीयवाद वाढला. महाजनादेश यात्रेचा समारोप यांनी केलेली पाप नाशिकमध्ये धुतली. या यात्रेत कोणी फुगे सोडल्या, कोंबड्या सोडल्या. छत्रपतींची पगडी घालून नरेंद्र मोदी शिवाय महाराज असू शकत नाही? असा सवाल उपस्थित केला.

नाशिकच्या सभेत शेवटच्या रांगेत उदयन महाराज यांना बसून छत्रपतींचा अवमान केला. गुजरातमध्ये जेवढी एसटी स्टँड आहेत, तेवढी विमानतळे शरद पवारांनी महाराष्ट्रात बांधली. भाजपात 70 टक्के राष्ट्रवादीची मंडळी गेली आहे. पक्षांतर करणाऱ्यांना अनेक पदे दिली. अनेक कंपन्या बंद पडल्या. हे सरकार परत आले तर गडकिल्ले भाड्याने देणार, यांनी अद्यापही आदेश मागे घेतला नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल जनतेत काहीही आत्मियता नाही. स्मार्ट सिटी काय असते ते पिंपरी-चिंचवडला अमित शहा यांनी भेट द्यावी. कितीही भाजपमय वातावरण असले तरी एकत्र या, असे आवाहन त्यांनी केले. शिवस्मारक, इंदूमिलच्या जागेत बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक नाही. बाळासाहेब ठाकरे यांचेही स्मारक सरकारने केले नसल्याचे त्यांनी यावेळी निक्षून सांगितले.

अजित पवार पुढे म्हणाले, आपण 10 वर्ष पालकमंत्री असताना पुणेकरांना पाणी कमी पडू दिले नाही. आज धरणात 100 टक्के पाणीसाठा असतानाही शहरात टॅंकर सुरू आहेत. हे सरकारचे अपयश आहे. पुणे – पिंपरी-चिंचवड मध्ये मेट्रो खालून न्यायची की वरून न्यायची, यातच वर्ष घालविले. विद्यमान खासदारांचे तिकीट कापले. जेष्ठ नेते एकनाथ खडसे, दिलीप कांबळे यांचे मंत्रिमंडळातील स्थान कमी करण्यात आले. पाच वर्षांत अडीच लाख कोटींचे कर्ज या भाजप सरकारने केले, अशा शब्दांत पवारांनी हल्लाबोल केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत काही नागरिकांनी काळे झेंडे, कडकनाथ कोंबडी, अंडी फेकली. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये ठेवले. आमचीही सत्ता होती. त्यावेळी मी त्या लोकांशी संवाद साधत असे. सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आला असतानाही यांच्या यात्रा सुरूच होत्या. आम्ही महापूर आलेल्या ठिकाणी नागरिकांना भेट दिली. तेव्हा यांनी यात्रा थांबवली. मुख्यमंत्र्यांनी पवार यांचे दिवस गेल्याचे म्हटले, त्यावर टीका करताना 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे येतात, असे सांगितले. राज्यात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पुणे जिल्ह्यात एकही नवीन प्रकल्प आणला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.