Mumbai : …अखेर मनसेचा झेंडा बदलला!; राज ठाकरे यांच्या हस्ते अनावरण

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं आहे. मनसेचं महाअधिवेशन आज पार पडत असून राज ठाकरे यांनी यावेळी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. मनसेच्या नव्या झेंड्यात भगवा रंग असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. या झेंड्याचा फोटो काही दिवसांपूर्वी समोर आला होता. मात्र, पक्षाकडून याची अधिकृत घोषणा झाली नव्हती. आज अखेर राज ठाकरे यांनी अधिकृतपणे नव्या झेंड्याचं अनावरण केले.

मनसेने याआधी अधिकृत ट्विटर हँडलवरुन पक्षचिन्हाच्या मागे असलेला झेंडा हटवला होता. त्याआधीपासून मनसे झेंडा बदलणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र ट्विटरवर बदल केल्यानंतर तसे संकेत मिळाले होते.

पक्षाच्या आधीच्या झेंड्यात निळा, भगवा आणि हिरवा असे तीन रंग होते. मात्र, आता त्यात बदल करण्यात आला असून चार रंगांऐवजी फक्त एकच भगवा रंग आहे. तसंत भगव्या रंगाच्या या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे.

  • छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा :

प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता।
शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।

  • अर्थ – प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृध्दिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे.

संभाजी ब्रिगेडचा विरोध
मनसेच्या नव्या झेंड्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा आहे. संभाजी ब्रिगेडने मनसेने झेंड्यात राजमुद्रेचा वापर केल्याने विरोध दर्शवला आहे. राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पत्राद्वारे त्यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे. गुन्हा दाखल न केल्यास संभाजी ब्रिगेड स्टाइलने आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.