Pune : कौशल्य विकास प्रशिक्षणाची युवकांनी कास धरावी – प्रसाद कुलकर्णी

'यशस्वी' संस्थेचा 'यशोत्सव' कार्यक्रम  उत्साहात

एमपीसी न्यूज – कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे रोजगारक्षम होण्याची संधी लवकर प्राप्त  होते, तसेच चांगली मिळकत प्राप्त  होऊन  करिअर  सुरक्षित  होण्यासाठी मदत होते. हे लक्षात  घेऊन युवकांनी कौशल्य प्रशिक्षणाची कास  धरावी, असे  आवाहन पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष  प्रसाद  कुलकर्णी यांनी केले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजीनगर येथे ‘यशस्वी’ संस्थेच्या वतीने आयोजित ‘यशोत्सव’ कार्यक्रमात ते बोलत  होते. केवळ नोकरी करण्याचा पर्याय शोधण्यापेक्षा कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराचा स्वावलंबी पर्याय निर्माण होतो. यामुळे उद्योजकता वाढीस लागते, असेही  प्रसाद  कुलकर्णी यांनी यावेळी  सांगितले.

याप्रसंगी संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘यशोगाथा’ या विशेषांकाचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर  त्यांच्यासमवेत ‘यशस्वी’ संस्थेचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र  सबनीस, संस्थेचे महाव्यवस्थापक प्रशांत पिटके  व प्रसिद्ध  एकपात्री कलाकार  मकरंद  टिल्लू उपस्थित होते. यावेळी मकरंद  टिल्लू  यांचा ‘हसायदान’ हा मनोरंजन व प्रेरणादायी व्याख्यानाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. आपल्या व्याख्यानात  विविध उदाहरणे  देत  जीवनातील हसण्याचे महत्व सांगत आरोग्याच्या दृष्टीने हसणे कसे फायदेशीर आहे, हे विविध प्रात्यक्षिकांद्वारे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी केले. संस्थेच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेत यामध्ये सर्वांचेच  योगदान असल्याचे नमूद  करत  प्रातिनिधिक स्वरूपात  श्रीकांत  तिकोने, नितीन  थेटे, प्रशांत कुलकर्णी व जितेंद्र पोळेकर  यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.

‘यशोत्सव’ कार्यक्रमाचे स्वरुप संस्थेतील सदस्य  कर्मचाऱ्यांच्या  कौटुंबिक  स्नेहमेळावा असे होते. कुटुंबातील ज्या ज्या व्यक्तींनी  त्यांच्या  व्यक्तिगत  आयुष्यात  जे काही यश  संपादन केले असेल अशांना सन्मानचिन्ह  देऊन गौरविण्यात आले. ज्यामध्ये मोठ्यांसह  लहान मुलांचाही समावेश होता. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गायन, वादन व नृत्य कलाप्रकार सादर करण्यात आले.

कार्यक्रमाला उपस्थित महिला सदस्यांना यावेळी संक्रांतीनिमित्त भेटवस्तू देण्यात आल्या. संगीत संयोजन पराग पांडव यांनी  केले. तर या कार्यक्रमासाठी श्वेता साळी, वैशाली भुसारे, प्राची राऊत, समृद्धी कोपल्लू, ईशा पाठक, शमिका  तांबे, योगेश निकम आदींनी विशेष सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.