Pune : ‘बार्टी’च्या अधिकारी, ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी; डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीकडून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन

एमपीसी न्यूज – “‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) अंतर्गत येरवडा येथील वसतिगृहात लहान मुलांना पुरवण्यात येणाऱ्या भोजनाचे ठेकेदाराकडून नियमाप्रमाणे भोजन पुरवले जात नाही. त्यामुळे लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी आवश्यक असे पोषक घटक त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत. परिणामी त्यांच्या आरोग्यास हानी पोहचत आहे. विशेष म्हणजे, असे असूनही संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत खोटे असताना सदर अन्न चांगले आहे, असा शेरा देऊन ठेकेदाराची सर्व बिले पास करण्याचे असंवेदनशील काम केले जात आहॆ. ठेका संपूनही ठेकेदार जितेंद्र मगर यांना बदलण्यात आले नाही. त्यामुळे बार्टीच्या अधिकाऱ्यांवर व संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी,” अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीचे अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केली आहे.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती’च्या वतीने सदर ठेकेदार जितेंद्र मगर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांना देण्यात आले. यावर मंत्रिमहोदयांनी सर्व जुने ठेकेदारांना काढून नव्याने निविदा काढून नवीन योग्य ठेकेदारांना सदर काम देण्यात येईल, असे आश्वासन दिले.

तसेच माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात पारदर्शक आणि इमानदारीने काम करणारे अधिकारी, ठेकेदारच कायम राहतील, अन्यथा त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा ‘बार्टी’मधील पहिल्या बैठकीत दिला. यावेळी संघटनेचे विशाल साळुंखे, सागर पानसरे, अमोल हुलावळे, जतीन परदेशी, हर्षद दौंडकर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.