New Delhi: दिलासादायक! यंदा मॉन्सून आगमन वेळेवर आणि 100 टक्के पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

एमपीसी न्यूज – यंदा मान्सूनचे वेळेवर होणार असून यावर्षी पाऊस सरासरीच्या 100 टक्के पाऊस होईल, असा पहिला अंदाज भारतीय हवामान खात्याने आज (बुधवारी) पत्रकार परिषदेत जाहीर केला. देशभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असताना, तिकडे भारतीय हवामान खात्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

मान्सून यंदा सरासरी 100 टक्के होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हा पहिला अंदाज असला तरी त्यामध्ये बदल होऊ शकतो. मान्सून एक जूनच्या सुमारास केरळच्या तिरुअनंतपूरममधून आगमन करेल, असे भाकितही हवामान खात्याने केले आहे, मात्र यामध्ये 3 ते 7 दिवस पुढे-मागे होऊ शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दक्षिण पश्चिम मान्सून जून ते सप्टेंबर या चार महिन्यात बरसतो. केरळमधून मान्सूनला सुरुवात होऊन, पुढे तो देशभर पसरतो. आयएमडीच्या या अंदाजाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या देश कोरोनाच्या संकटात असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. कृषी कामांना परवानगी असली तरी त्यासंबंधी व्यवहार काहीसे बंद असल्याने त्याचा फटका शेतीला बसला आहे. यंदा पाऊस सरासरीच्या 96 ते 100 टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

हवामान खात्याने गेल्या वर्षी 15 एप्रिल 2019 रोजी अंदाज वर्तवताना शेतकऱ्यांना खूशखबर दिली होती. त्यावेळीही मान्सून सामान्य राहील अशी माहिती हवामान खात्याने दिली होती. सरासरीच्या 96 टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला हा पहिला अंदाज होता. भारतात 96 टक्के ते 104 टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य मॉन्सून म्हटले जाते. 2018 मध्ये जुलै, सप्टेंबर महिन्यात पावसाची सरासरी 91 टक्के होती. त्यावेळी हवामान विभागाने 97 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. 2018 मध्ये पाऊस कमी झाल्यामुळे अनेक भागात दुष्काळाचं चित्र होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.