Dehuroad : विनाकारण एकाला दगडाने मारहाण करणाऱ्या चौघांवर गुन्हा
एमपीसी न्यूज – दुचाकीवरुन जात असलेल्या एका व्यक्तीला चार जणांनी मिळून विनाकारण दगडांनी मारहाण केली. यामध्ये तो व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 13) रात्री पावणे सातच्या सुमारास साईनगर, देहूरोड येथे घडली.
इर्शाद अफजल खान (वय 38, रा. थॉमस कॉलनी देहूरोड) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सलमान बशीर शेख (वय 20, रा. गहुंजेगाव, ता. मावळ), प्रशांत कृष्ण विराण, जोयल तिलानी, तेजस कांबळे (सर्व रा. देहूरोड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री पावणे सातच्या सुमारास फिर्यादी खान हे घरी जात होते. त्यावेळी साईनगर येथील व्ही डी आर मैदानाच्या शेजारी काही लोकांची गर्दी होती. गर्दी पाहण्यासाठी खान गेले असता त्यांना मागून कुणीतरी दगडाने मारले. यामुळे खान त्यांच्या दुचाकीवरून खाली पडले.
त्यानंतर आरोपी सलमान आणि प्रशांत हे कारमधून आले. आरोपी जोयल आणि तेजस हे खान यांच्या मागून आले. चौघांनी मिळून खान यांना दगड आणि विटांनी मारले. यात खान गंभीर जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सलमान याला अटक केली आहे.
देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.