Chinchwad: वाकडमधील विकासकामांमध्ये भाजप आमदाराचे अडथळे – राहुल कलाटे

BJP MLA Obstacles development works in Wakad - Rahul Kalate : आमदारांना मते हवीत पण  संपूर्ण मतदारसंघात विकास नकोय

एमपीसी न्यूज – भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडून वाकडमधील विकासकामांना राजकीय सूडभावनेतून खोडा घातला जात आहे.  वारंवार माझ्या प्रभागातील कामे त्यांच्याकडून अडविली जात आहेत. त्यांना केवळ संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांची मते हवीत. पण, विकासकामे नको आहेत, असा आरोप शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषदेत केला.  

विधानसभा निवडणुकीत मला मिळालेली मते पाहून ते घाबरले आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडून वाकडमधील विकास कामे अडविण्याची भूमिका घेतली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

महापालिका स्थायी समितीच्या आजच्या साप्ताहिक सभेसमोर कलाटे प्रतिनिधीत्व करत असलेल्या वाकड भागातील कामांचे विषय प्रशासनाने मान्यतेसाठी ठेवले होते.

त्यात दोन डीपी रस्ते, काँक्रीटीकरण आणि शाळेच्या इमारतीच्या कामाचा समावेश होता. पण, सभेच्या सुरुवातील आमदार जगताप यांच्या स्थायीतील सहा समर्थकांनी ही कामे मंजुरीला विरोध केला.

या कामांमुळे सरकारच्या 33 टक्के खर्चाच्या नियमाचे उल्लंघन करत नाही ना, तरतूद वर्ग केली आहे का, किती ठेकेदारांनी सहभाग घेतला होता याची माहिती मागिविली.

अभ्यास करण्यासाठी 15 विषय तहकूब करण्याची मागणी करणारे पत्र स्थायी समिती अध्यक्षांना दिले. त्यामुळे कोणतेही सबळ कारण न देता आजची सभा पुढील बुधवारपर्यंत तहकूब केली. दरम्यान, याप्रकरणात आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांनी शांत राहणे पसंत केले.

त्यानंतर शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी पत्रकार परिषेद घेत आमदार जगताप यांच्यावर हल्लाबोल केला.

कलाटे म्हणाले, भाजपच्या आमदाराला संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मते पाहिजेत. पण, विकासकामे नको आहेत. वाकड, ताथवडे, पुनावळे येथील तीन रोड, एक शाळेचे काम थांबविण्यासाठी भाजपच्या जगताप समर्थकांनी स्थायी समिती अध्यक्षांना पत्र दिले.

वाकडमधील इंदिरा कॉलेजपासून शाळेकडे जाणारा एक रस्ता, ताथवडेतील गाडा रोड, शनिमंदिरापासून इंदिरा शाळेकडे जाणारा रोड, काळाखडक ते वाकड, बालवडकर पेट्रोल पंप ते मॅझ्मीमा सोसायटी असे चार रोड आहेत.

प्रशासनाने संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करुन स्थायी समितीसमोर विषय मान्यतेसाठी ठेवला होता.  नवीन रस्ते होणार असलेल्या भागात 150 ते 200 गृहनिर्माण सोसायट्या आहेत. या नागरिकांना ये-जा करण्यासाठी व्यवस्थित रस्ते नाहीत.  नागरिकांची रस्त्यांची मागणी आहे. रस्तांची अतिशय गरज आहे.

पण, आडमुठेपणाच्या भूमिकेतून आमदार जगताप हे समर्थक नगरसेवकांच्या आडून विकासकामात खोडा घालत आहेत. करदात्या नागरिकांना त्रास देत आहे.

तर, दुसरीकडे चांगल्या रस्त्यांवर सिमेंट टाकले जात आहे.  राजकीय द्वेष भावनेतून माझ्या प्रभागातील विकासकामे अडविली जात आहेत. दोनवर्षापूर्वी देखील पाण्याच्या टाकीची कामे अडविल्याचा आरोप कलाटे यांनी केला आहे.

समर्थक नगरसेवकांच्या आडून आमदार जगतापांनी चिंचवड मतदारसंघातील विकासकामांचे राजकारण करु नये, असेही ते म्हणाले.  आमदारांना चिंचवड विधानसभेतील संपूर्ण भागाचा विकास होऊ द्यायचा नाही.

आम्ही लोकप्रतिनीधी म्हणून काम करत आहोत. तुम्ही राज्याच्या कामात लक्ष द्या. शहरातील कोरोनाच्या परिस्थितीकडे लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.