Talegaon : मावळ तालुक्यातील दुसरे आयटीआय तळेगावात आणण्यासाठी पाठपुरावा करणार – वैशाली दाभाडे
Will follow up to bring another ITI in Talegaon to Maval taluka - Vaishali Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषद शाळा क्रमांक दोनचा निकाल 100 टक्के; शाळा क्रमांक सहाचा निकाल 97.56 टक्के
एमपीसी न्यूज – संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक बापूसाहेब भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळाने दोन शाळांमध्ये दहावीचे वर्ग सुरू केले. नगरपरिषदेचा हा निर्णय विद्यार्थ्यांनी सार्थक करून दाखवला, अशी भावना उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी व्यक्त केली. तसेच मावळ तालुक्यातील दुसरे आयटीआय तळेगाव शहरात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर केले. त्यात तळेगाव दाभाडे नगरपरिषद शाळा क्रमांक दोनचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर शाळा क्रमांक सहाचा निकाल 97.56 टक्के लागला आहे.
शाळा क्र. 2 मधील मुस्कान शेख 85% गुण मिळवून प्रथम, रागीणी जैस्वाल 84% गुण मिळवून द्वितीय, तर राजीया शेख 82.80% व पायल पटेल 82.80% ह्या दोघींनी तृतीय क्रमांक मिळविला.
वैशाली दाभाडे म्हणाल्या, “शिक्षकांची मेहनत, रोटरी क्लब आणि अन्य सामाजिक संस्थांचे सहकार्य सातत्याने शाळा आणि विद्यार्थ्यांना मिळत आहे. विद्यार्थी देखील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून यश मिळवत आहेत. ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. सर्व विद्यार्थ्यांचे तळेगावकरांच्या वतीने अभिनंदन.
या विद्यार्थ्यांना पुढील काळात देखील शक्य तेवढी शैक्षणिक मदत करणे, नगरपरिषदेचा घटक म्हणून आम्ही सर्वजण करत राहू. मावळ तालुक्यात औद्योगिक पट्टा वाढत आहे. प्रत्येक पालकांना इच्छा असून देखील खर्चा अभावी आपल्या पाल्यांना डिप्लोमा किंवा डिग्रीसाठी ॲडमिशन घेता येत नाही.
माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी दूरदृष्टीने तालुक्यातील पहिले आयटीआय लोणावळा येथे आणले. औद्योगिक पट्ट्याची वाढ होत असल्याने तसेच विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण मिळण्यासाठी आपण मावळ तालुक्यातील दुसरे आयटीआय तळेगावात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दाभाडे म्हणाल्या.
यासाठी आपण पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचेही उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी सांगितले.