Maval News: रवींद्र महाराज पंडित यांना वारकरी मंडळींकडून श्रद्धांजली

मान्यवरांनी पंडित महाराज यांचे वारकरी संप्रदायमध्ये असणारे योगदान आणि अनेक ग्रंथाचा असणारा सखोल अभ्यास या याबद्दल विचार मांडले.

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील ज्येष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार रवींद्र महाराज पंडित यांचे नुकतेच निधन झाले. अखिल भारतीय वारकरी मंडळ मावळ तालुक्याच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थितांनी रवींद्र महाराज पंडित यांच्या आठवणींना उजाळा दिला.

मान्यवरांनी पंडित महाराज यांचे वारकरी संप्रदायमध्ये असणारे योगदान आणि अनेक ग्रंथाचा असणारा सखोल अभ्यास या याबद्दल विचार मांडले. संत साहित्याचा असणारा त्यांचा व्यासंग खूप मोठा होता आणि प्रवचनातून विचार मांडण्याची त्यांची हातोटी खूप वेगळी होती.

पंडित महाराज फक्त नावाने पंडित नव्हते तर त्यांच्या अभ्यासातून पंडित हे नाव सार्थ आहे हे त्यांनी समाजाला दाखवून दिले, त्यांच्याकडे कोणी वाद घेऊन गेले तर त्याचे रूपांतर ते संवादामध्ये करत असत, असे नितीन महाराज काकडे यांनी म्हटले.

नवमी मंडळामध्ये काम करताना पंडित महाराजांनी अनेकांना अध्यात्माची गोडी लावली, असे मत नवमी मंडळाचे सभासद खंडु कंधारे, काळुराम महाराज देशमुख यांनी व्यक्त केले.

श्री पोटोबा देवस्थान वडगाव मावळचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर यांनी पंडित महाराज यांचा समाज प्रबोधनातून मावळ तालुक्यातील प्रत्येक गाव आणि वाडी वस्तीशी संपर्क आला होता. त्यांच्या अचानक जाण्याने मावळ तालुक्यात वारकरी संप्रदायाची फार मोठी न भरून निघणारी हानी झाल्याचे म्हटले.

यावेळी वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुखदेव महाराज ठाकर, तालुकाध्यक्ष दत्ता महाराज शिंदे, पंचायत समिती सदस्य लक्ष्मणराव बालगुडे, दत्तात्रय लालगुडे, रमेश महाराज विकारी, पोटोबा देवस्थानचे सचिव अनंता कुडे, किरण भिलारे, अनंता महाराज शिंदे ,भरत वरघडे, प्रकाश गोणते, दिंडी समाज विणेकरी धोंडिबा केदारी, शांताराम दळवी, दिलीप महाराज खेंगरे, संतोष कुंभार, गोपीचंद महाराज कचरे, गणेश महाराज जांभळे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.