Pune News : जादा दर आकारणी करणाऱ्या दोन ॲम्ब्युलन्सवर कारवाई : जिल्हाधिकारी

कोविड - १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर ॲम्ब्युलन्स मालकांनी रुग्णांची वाहतूक करतांना आकारणी करावयाचे दर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे यांचेमार्फत निश्चित करण्यात आलेले आहेत.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या काळात जादा दर आकारणी दोन करणाऱ्या ॲम्ब्युलन्सवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गुरुवारी दिली.

मोटार वाहन क्रमांक एमएच-12 डीटी-3158  (Maruti Omni Ambulance) तसेच एमएच-14 सीडब्लू 0513 (Traveler Cardiac Ambulance) या ॲम्ब्युलन्स धारकांनी रुग्णाकडून जास्त भाडे घेतल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाली. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संबंधित वाहन मालकांविरुध्द तात्काळ कारवाई करण्याबाबतचे निर्देश दिले.

या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे येथील वायुवेग पथकाने या दोन्ही ॲम्ब्युलन्स ताब्यात घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे ठेवलेल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित वाहनांविरुध्द मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनुसार कारवाई करण्यात आलेली आहे.

कोविड – 19  महामारीच्या पार्श्वभूमीवर ॲम्ब्युलन्स मालकांनी रुग्णांची वाहतूक करतांना आकारणी करावयाचे दर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे यांचेमार्फत निश्चित करण्यात आलेले आहेत. तसेच निश्चित केलेले दर ॲम्ब्युलन्समध्ये दर्शनी भागात प्रदर्शित करण्याबाबतही यापूर्वी वृत्तनिवेदन देण्यात आले होते.

तसेच रुग्णाची वाहतूक करतांना जास्त दर आकारणी केले बाबत या कार्यालयाने जुलै 2020 मध्ये ॲम्ब्युलन्सच्या मालकाविरुध्द गुन्हा दाखल केलेला होता.

प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारणी करू नये म्हणून सर्व ॲम्ब्युलन्स धारकांना सुचना देण्यात आलेल्या होत्या. जादा दर आकारणी झाल्यास तात्काळ प्रादेशिक परिवहन कार्यालयास तक्रार नोंदविण्याबाबतही जनतेस आवाहन करण्यात आले होते.

रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ॲम्ब्युलन्सच्या वापरानुसार व प्रकारानुसार किती भाडे देण्यात यावे याची माहिती देण्यात येत आहे. सद्यस्थितीत कोरोनाग्रस्त पेशंटची संख्या वाढत असल्याने ठरवून दिल्याप्रमाणेच दर आकारणी करण्यात यावी असे आदेश सर्व ॲम्ब्युलन्स चालकांना देण्यात आले आहेत.

रुग्णवाहिकांनी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारल्यास तात्काळ प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे तक्रार दाखल करावी. या तक्रारीनुसार तात्काळ कठोर कारवाई केली जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.