Pune News : 106 बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब !

एमपीसी न्यूज : नवीन दत्तक नियमावली अमलात आल्यापासून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गेल्या दीड महिन्यात 106 बालकांचे दत्तक विधान आदेश केले आहेत. (Pune News) त्यामुळे या अनाथ, सोडून दिलेल्या बालकांना कायदेशीर पालक मिळाले आहेत.

यापूर्वीची दत्तक विधान आदेश प्रक्रिया ही किचकट होती. यामध्ये बाल कल्याण समितीने बालकाला दत्तकासाठी मुक्त केल्यावर आणि दत्तक समितीने मान्यता दिल्यानंतर संस्था दत्तकसाठीचे अर्ज वकिलामार्फत न्यायालयामध्ये दाखल करायची. न्यायाधीश दत्तकाचे आदेश देत होते. मात्र, केंद्रीय दत्तक स्त्रोत प्राधिकरणाद्वारे 23 सप्टेंबर 2022 च्या अधिनसूचनेनुसार नवीन दत्तक नियमावली बनवण्यात आली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून बालकांचे दत्तक आदेश देण्यात येत आहेत.

नवी नियमावली अमलात आल्यानंतर 106 बालकांचे दत्तकविधान आदेश देण्यात आले आहेत. या दत्तक विधानाची सुरुवात चालू वर्षी 14 नोव्हेंबर या बालदिनाचे औचित्य साधून करण्यात आली. 106 दत्तक आदेश झालेल्या बालकांपैकी 90 बालके देशांतर्गत दत्तक देण्यात आली आहेत, तर 16 बालके परदेशामध्ये (आंतरदेशीय) दत्तक देण्यात आली आहेत. या दत्तक आदेशामुळे या मुलांना त्यांच्या हक्काचे कायदेशीर पालक आणि हक्काचे कुटुंब मिळाले आहे. मुलाला जन्माने जे अधिकार मिळतात ते सर्व अधिकार आणि विशेषाधिकार दत्तक विधान आदेशामुळे प्राप्त होणार आहेत.

Rishabh Pant Accident : क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात

दत्तक नियमावलीमध्ये सुधारणा झाल्यानंतर न्यायालयाकडील वर्ग झालेली एकूण 100 प्रकरणे व कारा पोर्टल नुसार नवीन मान्य झालेली प्रकरणे यांची संख्या जास्त असल्याने जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी या सर्व प्रकरणात गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. (Pune News) त्यानुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद व कार्यालयातील कर्मचारी व तसेच जिल्ह्यातील मान्यता प्राप्त दत्तक संस्था सोफोश, भारतीय समाज सेवा केंद्र, रेणुका महाजन ट्रस्ट, अरुणाश्रय, महिला सेवा मंडळ, आधार दत्तक संस्था आणि पंडिता रमाबाई मुक्ती मिशन यांच्या एकत्रित प्रयत्नाने व सर्वांनी आपआपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्यामुळे सर्वाधिक 106 दत्तक विधान आदेश दीड महिन्यात पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

ज्या पालकांना मुल दत्तक घ्यावयाचे आहे त्यांनी दत्तक प्रक्रिया अंतर्गत बाळ दत्तक घेण्यासाठी https://cara.nic.in या संकेत स्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. अनिवासी भारतीय, भारतात राहणारे परदेशी पालक, नाते संबंधातील दत्तक इच्छुक पालक आणि सावत्र पालकांची दत्तक प्रक्रिया करण्यासाठी दत्तक नियमावली 2022 नुसार प्रक्रिया करणे गरजेचे आहे.

नोंदणी केल्यानंतर दत्तक इच्छुक पालकांची गृह भेट, सामाजिक तपासणी, आवश्यक दस्त ऐवजांची पूर्तता झाल्यानंतर ‘कारा’ संकेतस्थळावरून दत्तक नियमावली 2022 नुसार सर्व दत्तक विधान प्रक्रिया केली जाते. त्यानंतर सदर प्रकरण विशेष दत्तक संस्थामार्फत संस्थेत दाखल बालकांचे दत्तक प्रकरण जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्यामार्फत छाननी करून जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले जाते. (Pune News) तसेच नाते संबंधातील व सावत्र पालकाचे दत्तक प्रक्रियेची अर्ज ‘कारा’ पोर्टलवर मान्य झाल्यावर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्याकडून छाननी झाल्यावर जिल्हाधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी सादर केली जाते.

तिन्ही प्रकारचे दत्तक प्रकरण अर्जावर दत्तक नियमावली 23 सप्टेंबर 2022 नुसार केंद्रीय दत्तक स्त्रोत प्राधिकरण द्वारा नवीन दत्तक नियमावलीनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या मान्येतेने व स्वाक्षरीने बालकांचे दत्तक आदेश देण्यात येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.