Vadgaon Maval News : डेअरी प्रकल्पाच्या महिला संचालकांचे टाटा पॉवर व्यवस्थापनाविरुद्ध उपोषण

एमपीसी न्यूज –  टाटा कंपनीच्या पुढाकाराने सुरू केलेला महिला डेअरी प्रकल्प कंपनीने अर्ध्यावर सोडण्याचा निर्णय घेतल्याने डेअरी प्रकल्पाच्या महिला संचालकांनी शनिवार (दि 27) वडेश्वर येथे डेअरीच्या प्रवेशद्वारावर उपोषण सुरू केले आहे. 

डेअरी प्रकल्पाच्या अध्यक्षा भारती शिंदे, उपाध्यक्षा राधा जगताप, संचालिका सुरेखा शिंदे, छाया ठाकर, मनिषा कुडे, सुनंदा देशमुख, सुवर्णा म्हसे, कुसुम लष्करी, प्रभावती तळावडे, छाया हेमाडे यांनी उपोषण सुरू केले. यावेळी राष्ट्रवादीचे संघटनमंत्री नारायण ठाकर, शिवसेना तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम लष्करी, तुकाराम लष्करी, छगन लष्करी, उत्तम शिंदे, बबन हेमाडे,गुलाब गभाले, माउली जगताप आदी उपस्थित होते.

टाटा कंपनी व्यवस्थापनाच्या माध्यमातून ठोकळवाडी धरणग्रस्तांसाठी सन 2015 पासून स्थानिक महिलांकडून शेअर्स गोळा करून मावळ डेअरीची स्थापना करण्याचा निर्णय केला. सन 2018 ला प्रत्यक्षात टाकवे या ठिकाणी डेअरीची स्थापना केली. धरणग्रस्त परिसरातील महिलांना घेऊन त्यासमवेत टाटाचे दोन संचालक घेऊन डेअरी कार्यरत केली.

धरणग्रस्त महिलांना रोजगार मिळावा या उद्देशाने टाटा कंपनीने पुढाकार घेऊन महिलांना एकत्रित करून आंदर मावळ भागातील 12 महिलांचे संचालक मंडळ तयार करून एएलसी कंपनीमार्फत हा डेअरी प्रकल्प सुरु केला.

या प्रकल्पासाठी दहा कोटी रूपयांचे कर्ज घेतले आणि डेअरी प्रकल्पाच्या डोक्यावर कर्ज लादून ऐनवेळी या प्रकल्पातून माघार घेत या महिला संचालकांना मोठया अडचणीत आणून अन्यायकारक भूमिका कंपनीने घेतल्याचे संचालक मंडळाचे म्हणणे आहे. हा अन्यायकारक निर्णय कंपनीने मागे घ्यावा यासाठी महिला संचालकांनी उपोषण सुरू केले आहे.

महिलांच्या वैचारिक क्षमतेचा दुरान्वये उपयोग करून आपल्याला आवश्यक असणारे सर्व ठराव करून घेतले. एएलसी सारख्या मध्यस्थ संस्थेच्या मार्फत सर्व व्यवहार केले महिलांचा नाममात्र उपयोग केला. आज या स्थितीला डेअरी अडचणीत असताना महिलांची संमती न घेता एएलसीच्या समवेत केलेला करार रद्द करून टाटा कंपनीने महिला डेअरी चालविण्यासाठी सक्षम आहेत असे भासवून स्वतःही बाहेर पडत असल्याचे स्वतःहून स्वयंघोषित केले. त्याबाबत महिलांनी तत्काळ प्रत्युत्तर दिले. टाटाने डेअरी फायद्यात येत नाही तोपर्यंत बाहेर पडू नये, सर्व आर्थिक व्यवहारांची पूर्तता करावी अशी विनंती केली होती  तथापि गेल्या महिनाभरात टाटा कंपनीकडून कोणतीही मिटींग न घेता दुर्लक्ष केले त्या अन्यायाविरुद्ध महिलांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.