Nashik News : नाशिक शहरात कानेटकरांचे स्मारक व्हावे कलावंताची मागणी

एमपीसी न्यूज :  मराठी रंगभूमीला ८०च्या दशकात नवीन उर्जा देण्याचे काम कानेटकरांच्या नाटकाने केले. नाशिकच्या कर्मभूमीत वेगवेगळे विषय शोधून त्यावर नाटक उभारणारे कानेटकर हे मराठी नाटकांच्या इतिहासात मोठे नाटककार होते असे विचार अभिनेते सदानंद जोशी यांनी सार्वजनिक वाचनालयात झालेल्या नाटककार वसंत कानेटकर या कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नाटककार विवेक गरुड, नागेश कांबळे, लक्ष्मण बाणाईत, मुकुंद कुलकर्णी, मुक्तेश्वर मुन्नशेट्टीवार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते हे होते. कानेटकरांच्या विविध आठवणींना जयप्रकाश जातेगावकर, मुकुंद कुलकर्णी, विवेक गरुड, वसंत खैरनार, नागेश कांबळे यांनी उजाळा दिला.

नाशिक शहरात कानेटकरांचे यथायोग्य स्मारक उभे राहावे आणि त्यांच्या साहित्याचे जतन संवर्धन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करून कानेटकरांच्या आठवणींचा जागर करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालभवन प्रमुख संजय करंजकर यांनी केले.

कार्याध्यक्ष वसंत खैरनार यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे यांनी केले. कार्यक्रमास वाचनालयाचे प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर, सहा. सचिव अॅड. भानुदास शौचे, श्रीकांत बेणी यांच्यासह सुभाष पाटील, कृष्णा पवार, अनंत बाणाईत, वाचक सभासद व सेवकवृंद  उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.