Pimpri News: पुणे जिल्ह्यात टाळेबंदी करु नका – गजानन बाबर

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यासाठी नियमावली निश्चितपणे कडक करावी. पण, टाळेबंदी करू नये, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.

याबाबत बाबर यांनी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यामध्ये टाळेबंदीचा विचार करू नये असे पुणे जिल्ह्यातील नागरिकांचे मत आहे.

निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये तसेच पुणे जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, ही वास्तविकता आहे. कोरोनाची पहिली लाट व कोरोनाची दुसरी लाट यामध्ये खूप अंतर आहे, याचाही विचार केला पाहिजे.

पहिल्या लाटेमध्ये कोरोना संदर्भात काय ट्रीटमेंट द्यावी याची माहिती डॉक्टरांजवळ नव्हती. पहिल्या कोरोनाच्या लाटेमध्ये उपचारांच्या म्हणजेच आयसीयू बेड, व्हेंटिलेटर उपकरणे, ऑक्सिजन, कोविड सेंटर यांची कमतरता भासत होती. सर्वत्र भीतीचे वातावरण होते.

परंतु, आता परिस्थिती वेगळी आहे. पूर्वी नागरिक कोरोना बाबत दक्षता घेऊन सोशल डिस्टंसिंग, सॅनिटायझर व मास्क याचा उपयोग प्रामुख्याने न चुकता करत होते. परंतु, आता हे होताना दिसत नाही. हेच मुख्य कारण कोरोना वाढण्याचे आहे. आज आपण राज्यामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये टाळेबंदी केली तर नागरिकांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे बिघडणार आहे.

पुणे जिल्हा तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील कष्टकरी, कामगारवर्ग, हातावरपोट असलेले व्यापारी, उद्योजक, मजूरवर्ग , औद्योगिक कारखाने, हॉटेल्स व्यवसायिक, रिक्षावाले, टपरीधारक, सर्वसामान्य विक्रेते, छोटे उद्योजक, माथाडी कामगार, किरकोळ विक्रेते, दुकानदार यांचाही विचार करावा. एक वर्षापासून सर्वच वर्ग आर्थिक झळीला सामोरे जात आहेत.

जर टाळेबंदी केली तर आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे टाळेबंदी करु नये. पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमावली निश्चितच कडक करावी. परंतु टाळेबंदी नको, अशी मागणी बाबर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.