Bhosari Crime News : हवालदाराला मारहाण करणारा पोलीस शिपाई निलंबित
एमपीसी न्यूज – नाकाबंदीच्या ठिकाणी हजर होण्यास सांगितल्याने एका पोलीस शिपायाने पोलीस हवालदाराला उद्धटपणे बोलून लोखंडी गजाने मारहाण केली. या बेजबाबदार वागणुकीमुळे मारहाण करणाऱ्या पोलीस शिपायाला पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
सुरज जालिंदर पोवार, असे निलंबित झालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. किसन विठोबा गराडे (वय 52) असे मारहाण झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 22) रात्री साडेदहा वाजता हॅरिस ब्रिज, दापोडी येथे घडली होती.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी लावण्यात आली आहे. जुना पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी येथील हॅरिस ब्रिजवरही नाकाबंदी लावण्यात आली आहे. पोलीस हवालदार गराडे हे वाकड पोलीस ठाण्यात तर पोलीस शिपाई पोवार भोसरी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. फिर्यादी पोलीस हवालदार गराडे आणि आरोपी पोलीस शिपाई पोवार यांची ड्युटी गुरुवारी (दि. 22) त्या नाकाबंदी पॉईंटवर लावण्यात आली होती.
गुरुवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास नाकाबंदीच्या ठिकाणी हजर राहण्यासाठी फिर्यादी गराडे यांनी आरोपी पोवार याला फोनवर सांगितले. त्यावरून ‘तू माझा बाप आहेस का? तू मला कोण सांगणारा?’ असे उद्धटपणे बोलून पोवार लोखंडी गज घेऊन आला. त्याने गराडे यांना गजाने तसेच लाथांनी मारले. यात पोलीस हवालदार गराडे जखमी झाले आहेत.
पोवार याने बेजबाबदारपणे संवेदनशील बंदोबस्ताच्या नियोजनात हलगर्जीपणा केला. तसेच शासकीय कामात व्यत्यय आणण्याचे काम केले असल्याचा ठपका ठेवत पोवार याला पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.