Pune News : धरण फुल्ल, तरीही पुण्यात ‘टँकर’ने पाणी पुरवठ्याचे प्रमाण वाढले

एमपीसी न्यूज – शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे भरून वाहत असतानाही शहरात मागील चार आर्थिक वर्षामध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने ठेकेदारी पद्धतीने घेतलेल्या टँकरच्या फेर्‍या चार वर्षामध्ये दुप्पट झाल्या आहेत. खासगी टँकरच्या फेर्‍या निम्म्यावर आल्याने याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.  

पुणे शहराचा भौगोलिक आकार बशीसारखा आहे. सखल भागात मुबलक तर उंचावरील व प्रामुख्याने शहराच्या पुर्व, पश्‍चिम व दक्षिण भागातील उंचावरील भागामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होतो, ही वस्तुस्थिती आहे. यात प्रामुख्याने वडगाव शेरी, खराडी, हडपसर, कोंढवा, कात्रज, बाणेर, बावधन हा परिसर पूर्वीपासून पुरेशा पाण्यापासून वंचित आहे. तर मंतरवाडी येथील कचरा डेपोमुळे  भुगर्भातील पाणी दुषित झाल्याने या परिसरातील गावांना दररोज 200 टँकर पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

महापालिकेचे स्वत:चे टँकर असून महापालिका ठेकेदारी पद्धतीनेही टँकरने पाणी पुरवठा करते. यावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, 2017-18 या आर्थिक वर्षापासून दररोज टँकरच्या खेपा वाढत गेल्याचे पाहायला मिळत आहे. 2017-18 मध्ये महापालिकेच्या टँकरच्या 21 हजार 244, ठेकेदाराकडील टँकरच्या 1 लाख 1 हजार 458 आणि खासगी टँकर चालकांच्या 75 हजार 530 खेपा अशा 1 लाख 98 हजार 232 खेपा झाल्या होत्या. तर 2020-21 मध्ये महापालिकेच्या टँकरच्या 26 हजार 934, ठेकेदाराकडील टँकरच्या 1 लाख 96 हजार 539 तर खासगी टँकरच्या 44 हजार 403 अशा 2 लाख 67 हजार 876 खेपा झाल्या आहेत.

विशेष असे की 2020-21 मध्ये कोरोनामुळे अनेक आस्थापना बराच काळ बंद होत्या. तर कोरोनावरील उपचारासाठी अनेक ठिकाणी सुविधा करावी, लागल्याने टँकरने पाणी पुरवठा करावा लागला होता. तरीही टँकरच महापालिका, ठेकेदार तसेच खासगी टँकरच्या खेपा मात्र, आदल्या वर्षीच्या तुलनेत या काळात कमी झाल्या होत्या.

एकंदरच मागील चार वर्षात महापालिकेच्या टँकरच्या खेपा जेमतेम वाढत असताना ठेकेदाराकडील  टँकरच्या खेपा जोमाने वाढत गेल्या असून खासगी टँकरच्या खेपा मात्र निम्म्याने कमी झाल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.