Chikhali Crime News : प्रतिबंधित गुटखा आणि हुक्का फ्लेवर विकणाऱ्या तरुणास अटक

अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – कुदळवाडी, चिखली येथे गुरुवारी (दि. 5) दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी एका तरुणाला प्रतिबंधित गुटखा आणि हुक्का फ्लेवर विक्री केल्याप्रकरणी अटक केली आहे.

आतिक मोबीन अहमद खान (वय 25, रा. पवारवस्ती, चिखली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार संतोष दिघे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुदळवाडी मधील पाटील चौकाजवळ दोस्ती पान शॉप या टपरीमध्ये आरोपी खान प्रतिबंधित गुटखा आणि हुक्का फ्लेवर विक्री करत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास सापळा लावून टपरीवर कारवाई केली.

पोलिसांनी या कारवाईमध्ये 51 हजार 612 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि 54 हजार 90 रुपये किमतीचा हुक्का फ्लेवर जप्त केला. तसेच हुक्का फ्लेवर विक्री करून मिळालेली 70 हजार 40 रुपये रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे. एकूण 1 लाख 75 हजार 742 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत खान याला अटक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.