Talegaon Dabhade News: कर्करोगाशी झुंजणाऱ्या रुग्णाचा न्याय मिळविण्यासाठी आत्मदहनाचा इशारा

एमपीसी न्यूज – दुर्धर अशा कर्करोगाशी झुंज देत असताना उपचारांसाठी आपल्या आयुष्यभराची 41 लाख रुपयांची पुंजी परत मिळवून द्यावी, या मागणीसाठी तळेगाव दाभाडे येथील एका रुग्णावर थेट पोलीस महासंचालकांना आत्मदहनाचा इशारा देण्याची वेळ आली आहे. मुंबईतील संबंधित बिल्डरवर 15 दिवसांत कारवाई केली नाही तर कुटुंबीयांसह आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

अरुण बाजीराव गडदे (रा. भीमाशंकर कॉलनी, वराळे, तळेगाव दाभाडे) असे या हतबल झालेल्या रुग्णाचे नाव आहे. त्यांनी पोलीस महासंचालक संजय पांडे व मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना या संदर्भात निवेदन दिले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनीही या प्रकरणात लक्ष घातले असून या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गडदे यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.

मुंबई येथील मंगलमूर्ती एन्टरप्रायझेसचे मालक प्रकाश जनार्दन लामगे यांच्या विरोधातील पाच वर्षांपूर्वी दाखल झालेल्या फसवणूक आणि मोफा कायद्या अंतर्गत गुन्ह्याची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, तसेच आपले 41 लाख रुपये परत मिळवून देऊन जीवनाची लढाई जगण्यासाठी मदत करावी, अशी कळकळीची विनंती गडदे यांनी निवेदनात केली आहे.

गडदे यांनी नऊ वर्षांपूर्वी मुंबई येथील विकासक प्रकाश जनार्दन लामगे यांच्याशी फ्लॅट खरेदीबाबत रीतसर आर्थिक व्यवहार झाला होता. मात्र अद्यापही त्यांना फ्लॅटचा ताबा मिळालेला नाही. मुंबईत खेतवाडी सातवी गल्ली, खेमराज श्री कृष्णदास मार्ग, गिरगाव डिव्हिजन येथील प्लॉट क्रमांक 826 येथील अरब बिल्डिंगमध्ये 400 चौरसफूट क्षेत्रफळाचा फ्लॅट खरेदीसाठी 41 लाख रुपयांचा व्यवहार करून तसा नोंदणीकृत करार केला. ठरल्याप्रमाणे गडदे यांनी सर्व रक्कम धनादेशांद्वारे बिल्डरला देऊ केली. अद्यापही प्रकाश लामगे यांनी अरुण गडदे यांना फ्लॅटचा ताबा दिलेला नाही.

या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्रॉफर्ड मार्केट येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयाकडे प्रकाश लामगे यांच्या विरुद्ध 2016 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

बांधकाम सुरु करण्याची परवानगी मिळाल्यानंतर 30 महिन्यांच्या आत तयार झालेल्या फ्लॅटचा शांततामय मार्गाने ताबा देण्याचे लामगे यांनी मान्य केले. विक्रेता या करारनाम्याचे पालन करण्यात अयशस्वी झाला तर 15 दिवसांची नोटीस देऊन टोकन म्हणून घेतलेली रक्कम 12 टक्के वार्षिक व्याजाने खरेदीदाराला परत करेल, असे करारनाम्यात नमूद करण्यात आले आहे, मात्र या करारनाम्यात अटी आणि शर्तींचे पालन बिल्डरने केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर खरेदीदार यांनी गुन्हा दाखल केला. या घटनेस जवळपास नऊ वर्षे होऊन गेली मात्र अद्यापही खरेदीदार यांना त्यांची रक्कम व्याजासह मिळलेली नाही, असे गडदे यांनी निवेदनात म्हटले आहे.

सद्यस्थितीत या मिळकतीच्या विकासनाचे काम भगवान पालव अँड सन्स हे विकसक करीत आहेत, मात्र ते लामगे यांना घेऊन येण्यास सांगत आहेत. लामगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन महिन्यातच गडदे यांना कर्करोगाचे निदान झाले. तेव्हापासून त्यांच्यावर अद्यापही उपचार सुरु आहेत. सद्यस्थितीत ते तळेगाव दाभाडे येथे राहावयास आहे. कर्करोगावरील उपचारांमुळे त्यांना प्रवास करणेही शक्य नाही. त्यामुळे लामगे यांच्या विरोधातील गुन्ह्याचा तपास स्थानिक तळेगाव पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्याचा आदेश संबंधितांना द्यावा, अशी मागणी गडदे यांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे.

लामगे यांनी केलेल्या फसवणुकीमुळे आपले जगणे असह्य झाले आहे. आपल्याला उदरनिर्वाहासाठी आणि वैद्यकीय उपचारांसाठी पैशाची नितांत गरज आहे. त्यामुळे आपण या प्रकरणी लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा, अशी कळकळीची विनंती गडदे यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.