Vallabhnagar News: एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन

एमपीसी न्यूज – थकीत महागाई भत्ता मिळावा, वाढीव घरभाडे मिळावे, सणासाठी 12500 रूपये उचल मिळावी, दिवाळी बोनस 15 हजार मिळावा, सर्व कामगारांना ग्रेड पे ची रक्कम मिळावी, न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ठरलेल्या तारखेला वेतन मिळावे यासह विविध मागण्यासाठी वल्लभनगर आगारातील एसटी कामगारांनी गुरूवारपासून बेमुदत उपोषणाला सुरूवात केली. त्यामुळे ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांचे हाल झाले.

एसटी कामगार संघटनेच्या संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या उपोषणात वल्लभनगर आगारातील सुमारे 150 वाहक, चालक, क्लार्क आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत. याबाबत वल्लभनगर आगार कामगार संघटनेचे अध्यक्ष सिध्दार्थ कोरे म्हणाले की, एसटी महामंडळाने कर्मचार्‍यांचा सहानभूतीने विचार करावा. कर्मचार्‍यांना थकीत महागाई भत्ता मिळावा, वाढीव घरभाडे मिळावे, सणासाठी 12500 रूपये उचल मिळावी, दिवाळी बोनस 15 हजार मिळावा, सर्व कामगारांना ग्रेड पे ची रक्कम मिळावी, न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ठरलेल्या तारखेला वेतन मिळावे, कामगार कराराप्रमाणे सर्व कामगारांना नियमित वेतन द्यावे, ठरल्याप्रमाणे वार्षिक वेतन वाढीचा दर 2 ऐवजी 3 टक्याने वाढवून मिळावा, अशा आमच्या विविध मागण्या आहेत.

दरम्यान, अनेक प्रवाशी दिवाळी सणासाठी गावाकडे जाण्यासाठी वल्लभनगर आगारात आले होते. मात्र, कर्मचार्‍यांचे उपोषण असल्याने त्यांचा हिरमोड झाला. तर काही प्रवाशी एसटी बस कधी सुरू होणार आहेत, याची विचारणा करत होते. गुरूवारी वल्लभननगर आगारातून एकही एसटीची फेरी झाली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.