Pimpri News: ‘सार्वभौम भारताची एकता, एकात्मता आणि अखंडता अबाधित ठेवण्याचे श्रेय संविधानाला’

एमपीसी न्यूज – भारतीय संविधान हा ग्रंथ प्रत्येक भारतीय नागरिकासाठी सर्वोच्चस्थानी असून संविधानामुळेच भारतातील विविध धर्म एकोप्याने राहत आहेत. सार्वभौम भारताची एकता, एकात्मता आणि अखंडता अबाधित ठेवण्याचे श्रेय संविधानाला जाते असा सूर ‘भारतीय संविधान आणि समाज’ या विषयावरील परिसंवादात निघाला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्त पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील मैदानात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ‘भारतीय संविधान आणि समाज’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. ह.भ.प. अजय महाराज बारस्कर, मौलाना अलिम अन्सारी, मौलाना अब्दुल गफ्फार, भिक्खुनी डॉ. सुमना, डॉ. सामनेरी उपलवना या परिसंवादात सहभागी झाले होते.

भारतीय संविधान आणि वारकरी संप्रदाय यांचे एकमेकांशी असलेले नाते यावेळी हभप अजय महाराज यांनी विशद केले. ते म्हणाले, मानवतेची मुल्ये संतांनी आपल्या शिकवणीतून जनसामान्यात रुजवली. या मूल्यांचे प्रतिबिंब संविधानात समाविष्ट आहेत. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये संपूर्ण संविधानाचे सार सामावले आहे. संविधान सर्वश्रेष्ठ असून त्याची जपणूक करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. मौलाना अलीम अन्सारी म्हणाले, भेदभाव आणि विषमतेला मूठमाती देऊन भारतीय संविधानाने समाजाला न्याय, स्वातंत्र्य, समता, आणि बंधुता बहाल केली. त्यामुळे या देशात सर्वधर्म एकत्रित नांदत आहेत. प्रत्येक धर्मातील नागरिक आज संविधानामुळे सुरक्षित आहे.

अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची आणि लढण्याची ताकद संविधानाने दिली आहे. देश मजबूत ठेवण्यासाठी, देशातील सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी संविधानाची जपणूक करून त्याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. भारतीय संविधान भक्कम असल्यामुळे समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत असेदेखील मौलाना अन्सारी यांनी सांगितले. भिक्खुनी डॉ. सुमना म्हणाल्या, बौद्ध धम्मातील तत्व आणि विचार भारतीय संविधानात अंतर्भूत आहे. समाज उन्नतीसाठी भारतीय संविधान महत्वपूर्ण असून बलशाली राष्ट्र उभारणीसाठी संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाची तत्वे समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचली पाहिजे असे त्या म्हणाल्या. परिसंवादाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी केले.

कार्यक्रमाला महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले यांच्यासह सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता शरद जाधव, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, सर्वजीत बनसोडे, देवेंद्र तायडे, आनंदा कुदळे, बापूसाहेब गायकवाड, भाऊसाहेब डोळस, राजेंद्र पवार, अॅड. विद्या शिंदे आदी उपस्थित होते.

दरम्यान , ‘भारतीय संविधान‘ या विषयावर संविधान अभ्यासक श्रीकांत लक्ष्मीशंकर यांचे व्याख्यान संपन्न झाले. भारतीय संविधानाचे वाचन प्रत्येकाने केले पाहिजे. यातील मूलभूत हक्क अधिकार आणि कर्तव्याची जाणीव प्रत्येकाला होणे गरजेचे आहे. आपण सक्षम झाल्यास पर्यायाने लोकशाही सक्षम होते. संविधानिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे असे लक्ष्मीशंकर म्हणाले. यानंतर गायक सुधाकर वारभुवन यांचा गीतगायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. सायंकाळी सुप्रसिद्ध गायक विजय सरतापे आणि राहूल शिंदे यांनी प्रबोधनात्मक संविधान गीते सादर केली. तसेच सृष्टी चौक, पिंपळेगुरव येथे सुप्रसिध्द गायिका रेश्मा सोनवणे आणि संकल्प गोळे यांचा प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम सादर झाला. सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष जोगदंड, धम्मराज साळवे, विनोद गायकवाड, मिलिंद घोगरे, मनोज गजभार, राहुल सोनवणे, प्रकाश बुक्तर, उत्तम कांबळे, तुकाराम गायकवाड, विशाल जाधव, विशाल कांबळे, राहुल सोनवणे, संतोष शिंदे, विष्णू मांजरे, गिरीश वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.