रोमहर्षक लढतीत खासदार पूत्र विजयी; तीन विद्यमान नगरसेवकांचा पराभव

एमपीसी न्यूज – डेक्कन जिमखाना, प्रभाग क्रमांक 14 मध्ये झालेल्या रोमहर्षक लढतीत खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव सिद्धार्थ शिरोळे विजयी झाले आहे. सिद्धार्थच्या विजयाने विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, उपमहापौर मुकारी अलगुडे आणि नगरसेवक राजू पवार यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

 

पुणे शहरातील प्रभाग क्रमांक 14 डेक्कन जिमखानाच्या लढतीकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले होते. पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव सिद्धार्थ शिरोळे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यांच्या उमेदवारीला अंतर्गत विरोध होता. त्यामुळे त्यांची निवडणूक कठिण मानली जात होती. मात्र, तरी देखील सर्व विरोधाला आणि गटबाजीला सामोरे जात प्रभाग क्रमांक 14 मधून सिद्धार्थ शिरोळे हे विजयी झाले. त्यांच्यासमोर विद्यमान उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके आणि नगरसेवक राजू पवार यांचे मोठे आव्हाने होते. त्यांनी या सर्वांचा पराभव करीत संपूर्ण पॅनल निवडून आणण्यात त्यांना यश आले. अनुसुचित जाती गटातून स्वाती अशोक लोखंडे, ओबीसी महिलांमधून निलिमा खाडे आणि खुल्या महिला गटातून प्रा. ज्योत्सना एकबोटे विजयी झाल्या.

 

अत्यंत रोमहर्षक झालेल्या या लढतीत सकाळी पहिल्या फेरीत मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सिद्धार्थ शिरोळे हे पिछाडीवर पडले होते. पहिल्या फेरीतील मतमोजणी संपेपर्यंत सिद्धार्थ शिरोळे पराभूत होणार, असेच चित्र होते. मात्र, नंतरच्या फेरीतील मतमोजणीने संपूर्ण चित्र पलटले आणि पिछाडीवरून आघाडी घेत सिद्धार्थ यांचा विजय झाला.  या विजया नंतर सिद्धार्थ शिरोळे म्हणाले की, प्रभाग क्रमांक 14 मधील प्रत्येक भागाचा कायापालट करण्यात येणार असून अनेक राबविण्यावर भर राहणार आहे. सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

खासदार अनिल शिरोळे म्हणाले की, पुणे शहरातील सर्व जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहे. त्या सर्वांचे स्वागत आहे. तसेच प्रभाग क्रमांक 14 मध्ये सिद्धार्थ निवडून आल्याने आणखी आनंद झाला आहे. भविष्यात प्रभागातील प्रश्नाबाबत सभागृहात प्रश्न मांडून निश्चित विकास करेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.