Pune : चांदणी चौकातील उड्डाणपुलासाठी राज्य सरकारकडून 185 कोटी

आमदार मेधा कुलकर्णी यांनी दिली माहिती

एमपीसी न्यूज- चांदणी चौकातील नियोजित उड्डाणपुलाचे भूमिपूजन केल्यानंतरही भूसंपादनासाठी पालिकेने पुरेसा निधी न दिल्यामुळे एका वर्षानंतरही काम सुरू झाले नाही. त्यामुळे अखेर राज्य सरकारने चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या जागेच्या भूसंपादनासाठी 185 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती आमदार मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे.

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामासाठी केंद्र सरकारने 450 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या कामाची निविदा काढण्यात आली होती. या कामाचे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन देखील झाले होते. या उड्डाणपुलासाठी जागेचे भूसंपादन करण्याची जबाबदारी महापालिकेची होती. मात्र, वर्षभराचा कालावधी होऊन देखील यामध्ये पालिकेला यश आले नाही त्यामुळे जागा ताब्यात आलेले नसल्याने काम सुरू करता येत नव्हते.

पालिकेने भूसंपादनासाठी निधी देण्याबाबत असमर्थता दर्शवली होती त्यामुळे राज्य शासनाचा निधी मिळवण्यापासून पर्याय नव्हता. त्यासाठी गेले काही महिने पाठपुरावा केला त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सर्वसाधारणपणे ड वर्ग पालिलेला राज्य शासनाचा निधी दिला जातो. मात्र, पुणे महापालिका त्या यादीत नसतानाही हा निधी दिला आहे असे आमदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.