Pune : बहारदार सहगायन आणि सहवादनाने रंगला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा पाचवा दिवस

एमपीसी न्यूज – अर्शद अली आणि अमजद अली या गायक बंधूंचे, तसेच अपूर्वा गोखले- पल्लवी जोशी या भगिनींचे रंगलेले सहगायन आणि निर्मला राजशेखर- इंद्रदीप घोष यांनी घडविलेला वीणा आणि व्हायोलिनच्या बहारदार सहवादनाचा आविष्कार याने ६६ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा शेवटचा दिवस सुरेल झाला.

किराणा घराण्याचे युवा गायक अर्शद अली आणि अमजद अली यांनी आपल्या गायनाची सुरूवात राग ‘शुद्ध सारंग’ने केली. त्यानंतर त्यांनी ‘बाजे रे मुरलिया बाजे’ हे लोकप्रिय भजन सादर केले. त्यांनी आपल्या गायनाचा समारोप करताना सादर केलेल्या ‘ज्ञानियांचा राजा गुरू महाराव’ या संत तुकारामांच्या अभंगास रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली. त्यांना प्रशांत पांडव (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), दीपक गलांडे व सत्यवान पाटोळे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी या गायिका भगिनींनी आपल्या सहगायनात राग ‘गौड सारंग’ प्रस्तुत केला. त्यांना स्वप्नील भिसे (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम) आणि अमृता शेणॉय कामत व प्रियांका मयेकर भिसे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

त्यांच्यानंतर प्रसिद्ध वीणावादक निर्मला राजशेखर आणि व्हायोलिनवादक इंद्रदीप घोष यांचे सहवादन झाले. कर्नाटक व हिंदुस्थानी संगीताचा सुरेख मिलाफ असलेल्या त्यांच्या वादनाने रसिकांची उदंड दाद मिळवली. त्यांनी राग ‘हंसध्वनी’मधील ‘वातापि गणपती भजेहं’ या गणेशवंदनेने आपल्या वादनाला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी राग ‘चारुकेशी’मधील काही रचनाही सादर केल्या. त्यांना पं. रामदास पळसुले (तबला), तंजावुर मुरगा भूपती (मृदंगम्) आणि दिगंबर शेडुळे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

त्यानंतर मेवाती घराण्याचे प्रसिद्ध गायक संजीव अभ्यंकर यांचे गायन झाले. त्यांनी राग ‘पूर्वी’ सादर केला. भक्तीरसातील काही स्वरचित रचना त्यांनी प्रस्तुत केल्या.  त्यांनी राग‘शुद्ध बराडी’ देखील सादर केला. संत तुकारामांचा ‘बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल’ हा अभंग स्वरचित चालीत सादर करून त्यांनी गायनाचा समारोप केला. त्यांना अजिंक्य जोशी (तबला), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), अश्विनी मिसाळ (तानपुरा), धनंजय म्हसकर व बिलिना पात्रा (गायनसाथ) , अपूर्व द्रविड (टाळ) यांनी साथसंगत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.