Pimpri : पिंपरी मेट्रो स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देणार

महापौर राहुल जाधव यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समितीच्या शिष्ठमंडळाला आश्वासन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह उभारण्यासाठी जागा उपलब्ध करुन देऊ, तसेच पिंपरी मेट्रो स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देणेबाबत प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन महापौर राहुल जाधव यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समितीच्या शिष्ठमंडळाला दिले.

मेट्रोच्या विकास कामात पिंपरी, मोरवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा शेजारील जागेत पिलर येत असल्यामुळे पुतळा झाकून जात आहे. त्या संदर्भात महापौर कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी नगरसदस्या आशाताई धायगुडे, अहिल्यादेवी होळकर उत्सव समितीचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व पिंपरी चिंचवड शहर धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष राजू दुर्गे व पदाधिकारी, कार्यकारी अभियंता जुंधारे, मेट्रोचे अधिकारी सुब्रम्हण्यम, बापु गायकवाड आदी उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती आणि पिंपरी चिंचवड शहर धनगर समाज महासंघ यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह उभारण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणे, पिंपरी मेट्रो स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्याची मागणी केली.

यावेळी महापौर राहुल जाधव म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरातील सर्व धनगर समाजाला योग्य तो न्याय देण्यात येईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह उभारण्यासाठी जागा उपलब्ध करुन देऊ. तसेच पिंपरी मेट्रोला स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देणेबाबत पदाधिकारी, अधिकारी यांची बैठक घेऊन योग्य तो तोडगा काढू, असे आश्वासन त्यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.