Pune : जेरबंद झालेला ‘त्या’ बिबट्याची प्रकृती खालावली

एमपीसी न्यूज- दोन दिवसांपूर्वी मुंढव्यातील केशवनगर परिसरातून जेरबंद करण्यात आलेल्या ‘त्या’ बिबट्याची प्रकृती खालावली आहे.

अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्या बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते. त्यानंतर त्याला कात्रज येथील वन्यप्राणी अनाथालयात हलवण्यात आले होते. सध्या त्याची प्रकृती खालावल्याची माहिती मिळाली आहे. येथील अनाथालयात आणल्यापासून त्याची प्रकृती बिघडली, अशी माहिती अनाथाल्याचे प्रमुख अनिल खैरे यांनी दिली आहे.

  • मुंढवा येथील केशवनगर भागात शिरलेल्या बिबट्याला वनविभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी जेरबंद केले होते. दरम्यान, त्याने वनविभागाच्या एका कर्मचाऱ्यावर हल्ला चढविला होता. यामध्ये त्यांच्या हाताला जखम झाली. त्यानंतर त्याला जाळी टाकून पकडून त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले होते.

सध्या बिबट्या मानववस्तीत येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याअगोदर बिबट्या वारजे परिसरात दिसला होता. सध्या बिबट्याची मानववस्तीकडे वाटचाल होत असल्याचे आढळत आहे. तर,वन्य प्राण्याचा अधिवास नामशेष होऊ लागल्यामुळे वन्य प्राणी आपल्या अधिवासच्या शोधात भरकटत असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, वन्य प्राण्यांचा अधिवास अबाधित ठेवण्यासाठीही शासनस्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.