Hadapsar : दारुसाठी रिक्षा चालकाकडून प्रवाशाची लुटमार
एमपीसी न्यूज – हडपसर येथे रिक्षा चालकाने प्रवाशाला दारू पिण्यासाठी पैसे हवे म्हणून आपल्या अन्य साथीदारांच्या मदतीने मारहाण करीत 18 हजारांना लुटले. ही घटना रविवारी (दि.5) पहाटे अडीच वाजता आकाशवाणी समोर हडपसर पुणे-सोलापूर रोडवर घडली.
याप्रकरणी मोहसीन शेख यांनी हडपसर पोलिसांना फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सहा जणांना अटक केली. गौरव गायकवाड (वय 19,रा. चिखली), जयदीप शहा (वय 19, चाकण), शुभम काळे (वय 19, फुरसुंगी पुणे), अंकीत राऊत (वय 26, रा. फुरसूंगी), अमोल शिंदे (वय 29, फुरसुंगी, पुणे), रोहित भोसले (वय 24, रा. फुरसूंगी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहसीन शेख हे रविवारी रात्री दोन वाजता काही कामानिमित्त पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचले. यावेळी उरळी कांचन येथे जाण्यासाठी शेख आरोपींच्या रिक्षात बसले. हडपसर येथील आकाशवाणी केंद्रासमोर रिक्षा आली असताना, आरोपीने त्यांची रिक्षा थांबवून त्याच्या साथीदाराच्या मदतीने शेख यांना दारु पिण्यासाठी पैसे मागितले. शेख यांनी नकार दिल्यामुळे रिक्षा चालकाने आपल्या अन्य साथीदारांना बोलवून त्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या खिशातील 700 रुपये रकम आणि मोबाईल असा एकूण 18 हजार 700 रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. शेख यांनी आज सोमवारी सकाळी ससून येथे उपचार घेतल्यानंतर हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एक रिक्षा आणि दोन मोटार सायकली ताब्यात घेतल्या. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहे.