Talegaon Dabhade News : सहा वर्षांपासून बंद असलेल्या नॅशनल हेवी कंपनीतील कामगारांचा मेळावा

एमपीसी न्यूज – मागील सहा वर्षांपासून तळेगाव परिसरातील नॅशनल हेवी ही कंपनी बंद आहे. कंपनीने कामगारांना केवळ 20 हजार एवढी रक्कम दिली असून कामगारांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. कामगारांच्या अडचणी समजून घेण्यासाठी माजी कामगार युनियनचे अध्यक्ष बाळासाहेब सातकर यांच्या अध्यक्षतेखाली स्नेहमेळावा घेण्यात आला.           

या मेळाव्यास माजी जनरल सेक्रेटरी अशोक तोडकर, माजी उपाध्यक्ष सुदाम डांगे, ह भ प मनोहर ढमाले, सिताराम साळुंकेसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सन 2015 पासून कंपनी बंद अवस्थेत आहे. या कालावधीमध्ये कामगारांना कंपनीने एप्रिल 2015 मध्ये 15 हजार रुपये व 2019 मध्ये 5 हजार रुपये एवढीच रक्कम दिलेली आहे.

गेली सहा वर्षांमध्ये कंपनी बंद असल्याने अनेक जणांना उपजीविकेसाठी वाटेल ते काम करावे लागत आहे.यामध्ये अनेक कामगारांचे घराचे हप्ते थकलेले आहेत, मुलीं, मुलांची लग्न, शिक्षण, घराचे भाडे व उदर निर्वाह करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

याप्रसंगी अनेक कामगारांनी युनियनच्या पदाधिकार्‍यांच्या समोर आपल्या अडचणी व घरगुती व्यथा सांगितल्या.तसेच या सहा वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक कामगारांचे अनेक कारणाने मृत्यू देखील झाले आहेत याचा शोक देखील या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थापनाच्या फसव्या आश्वासनाला वेळोवेळी आपण सर्व जण बळी पडलो आहोत. यापुढे लवकरात लवकर जर व्यवस्थापनाकडून कामगारांना भरीव मदत मिळाली नाही तर कायदेशीर मार्गाने पुढील वाटचाल राहील. असे मान्यवरांनी मत व्यक्त करून कामगारांना दिलासा दिला.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.