Chinchwad Crime News : तब्बल 300 कंपन्या चेक केल्यानंतर पोलिसांच्या हाती लागले असे काही…. वाचा सविस्तर

एमपीसी न्यूज – दीड वर्षांपूर्वी चिंचवड परिसरात एका व्यक्तीचा खून झाला. त्यातील मयताची ओळख पोलिसांना पटली नाही. त्यामुळे पोलिसांनी पिंपरी चिंचवड परिसरातील तब्बल 300 कंपन्या चेक केल्या. त्यानंतर पोलिसांना खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बिहार येथून दोघांना बेड्या ठोकल्या.

रत्नेशकुमार रमाकांत रॉय, सुबोध अखींदर प्रसाद कुशवाह (रा. पूर्व चंपारण्य, बिहार) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्या दोघांनी राकेश कुमार या व्यक्तीचा खून केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 12 फेब्रुवारी 2021 रोजी 20 ते 25 वर्ष वयाच्या तरुणाचा मृतदेह गळा कापलेल्या अवस्थेत चिंचवड परिसरात आढळला. मयताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना अपयश आले. तब्बल दीड वर्ष या गुन्ह्याचा पोलीस तपास करीत होते.

दरम्यान गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी भोसरी एमआयडीसी आणि चिखली परिसरातील तब्बल 300 कंपन्या चेक केल्या. दरम्यान एका कंपनीत चौकशी करताना एक कामगार दीड वर्षांपासून कामावर गैरहजर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी कंपनीच्या मालकाला मयत व्यक्तीचा फोटो दाखवला असता तो त्यांच्या कंपनीत कामाला होता तसेच तो दीड वर्षांपासून कामावर गैरहजर असल्याचे मालकाने पोलिसांना सांगितले.

मयताची ओळख पटविल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपी रत्नेशकुमार आणि सुबोध या दोघांना बिहार येथून अटक केली. त्यांना पुण्यात आणून चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचे कबूल केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.