Pimpri News : भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी शहरात ‘अभिमान अभियान’

एमपीसी न्यूज – देशाचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी नेतृत्वात भाजपाने 4 राज्यात ऐतिहासिक विजय प्राप्त करून पूर्ण बहुमतात सरकार स्थापन केले आहे. ही खूप आनंदाची व गौरवाची गोष्ट आहे. यासह भाजपा स्थापना दिनी उद्या (बुधवारी) पिंपरी-चिंचवड शहरात ‘अभिमान अभियान’ सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा प्रवक्ते व संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिली.

भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या 6 एप्रिल रोजी पिंपरी- चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या निर्देशानुसार, महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात 6 ते 10 एप्रिल या कालावधीमध्ये ‘अभिमान अभियान’ राबवण्यात येणार आहे. तसेच, शहरातील सर्व शक्ती केंद्रांवर मोठ्या उत्साहात स्थापना दिवस साजरा करण्यात येणार आहे.

भाजपाच्या प्रत्येक मंडलातील माजी नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, मोर्चा अध्यक्ष व पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व बूथ वरील सर्व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी होतील, असेही अमोल थोरात यांनी म्हटले आहे.

…असे आहेत विविध कार्यक्रम!

भाजपा स्थापना दिनी पक्षाच्या मुख्य जनसंपर्क कार्यालयात सकाळी ध्वजारोहण, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. त्याचे लाईव्ह प्रक्षेपण, मंडल स्तरावरही स्क्रीन लावले जाणार आहेत. सर्व मंडल अध्यक्ष यांचेवर  अभियानाचे अभियान प्रमुख म्हणून जबाबदारी असेल. भाजपा स्थापनेच्या दिवशी प्रत्येक पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख व सर्व कार्यकर्ते यांनी आपल्या घरावर पक्षाचा झेंडा लावणार आहेत. तसेच, आपल्या पदाची पाटी घरावर लावावी  जाणार आहे. परिसरातील माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक,प्रबुद्ध नागरिक यांचा सन्मानही करण्यात येणार आहे, असे अमोल थोरात यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.