Bhosari : हवेत गोळीबार करून दुकानदाराला लुटल्या प्रकरणातील फरार आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – भोसरीमधील अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोर पादचारी मार्गावर दुकान मांडून बसणा-या तरुणास पाच जणांनी मिळून लुटले. दरम्यान, एकाने हवेत गोळीबार करून परिसरात दहशत पसरवली. या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी मागील काही दिवसांपूर्वी बेड्या ठोकल्या. तर फरार असलेल्या चौथ्या गुन्हेगाराला देखील भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.

सनी उर्फ सँडी कन्हैयालाल गुप्ता (वय 24, रा. बो-हाडे वस्ती, मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर यापूर्वी शिवाजी खरात, विकास जैसवाल, गुरुदत्त उर्फ बाबा अशोक पांडे (रा. नारायण रसाळ चाळ, मंडई जवळ, भोसरी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अक्षय अंगत भांडवलकर (वय 21, रा. धावडे वस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा मोबाईलचे स्पेअर पार्ट विक्रीचे काम करतात. पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथे अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या समोर अक्षय त्याचे दुकान मांडतो. 11 ऑगस्ट रोजी पाच आरोपी दुपारी त्याच्या दुकानासमोर कारमधून आले. ‘तुझ्याकडे जे असेल ते काढून दे, आम्ही इथले भाई आहोत’ असे म्हणून आरोपींनी अक्षय यांना दमबाजी केली. अक्षय यांनी आरोपींना पैसे देण्यास विरोध केला. त्यावरून चिढलेल्या आरोपी सनी याने पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. त्यानंतर अक्षय यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीची दोन तोळ्यांची सोन्याची साखळी आणि दुकानाच्या पेटीतून 2 हजार 450 रुपये जबरदस्तीने घेऊन गेले.

या गुन्ह्यातील तीन आरोपींना पोलिसांनी यापूर्वी अटक केली. चौथा आरोपी सनी कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी समीर रासकर व सुमित देवकर यांना मिळाली. त्यानुसार भोसरी पोलिसांनी परिसरात सापळा रचून सनी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली 35 हजार रुपयांचे एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक पुंगळी जप्त केली आहे. आरोपी बाबा पांडे याच्याकडून अक्षय यांची चोरून नेलेली 60 हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी देखील पोलिसांनी जप्त केली आहे.आरोपी सनी आणि बाबा पांडे या दोघांवर गंभीर आठ गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उप आयुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, पोलीस कर्मचारी गणेश हिंगे, आशिष गोपी, सुमित देवकर, समीर रासकर, संतोष महाडिक, विकास फुले, बाळासाहेब विधाते, सागर जाधव, संदीप जोशी, अनिकेत पाटोळे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.