Pimpri News : अखेर दोन महिन्यांनी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ महापालिकेत रुजू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत 17 सप्टेंबर 2021 रोजी प्रतिनियुक्तीने नियुक्त झालेले अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ अखेर महापालिकेत रुजू झाले आहेत. तब्बल दोन महिन्यांनी वाघ आज (शुक्रवारी) महापालिकेत दाखल झाले. दरम्यान, महापालिकेतील ‘कलेक्टर’ अशी ओळख असलेल्या एका अधिका-याने वाघ यांची बदली लांबविल्याची चर्चा होती.

महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे आहेत. राज्य सेवेतील दोन आणि स्थानिक अधिका-यांमधून एक अशी विभागणी आहे. प्रतिनियुक्तीवरील विकास ढाकणे आणि स्थानिक अधिका-यांमधील उल्हास जगताप असे दोन अतिरिक्त आयुक्त आहेत. तर, तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना कार्यमुक्त केल्यानंतर सहा महिन्यांनी शासनाने राज्याच्या महसूल विभागातील अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पुणे मेट्रो रेल प्रकल्पाच्या वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (जमीन) या पदावरून जितेंद्र वाघ यांची पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्रतिनियुक्तीने नेमणूक केली. त्याची ऑर्डर 17 सप्टेंबर 2021 रोजी निघाली होती. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी वाघ आज (गुरुवारी) महापालिकेत रुजू झाले.

आता महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्त झाले आहेत. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडील विभाग कमी होतील. आयुक्त राजेश पाटील कोणते विभाग कोणाकडे देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.