Mahavitarn News : अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल नियमानुसारच; महावितरणचे स्पष्टीकरण

एमपीसी न्यूज – महावितरणच्या वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात आले आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशाप्रमाणे हे बिल नियमानुसार असून जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवर वीजग्राहकांना दरवर्षी मिळणारी व्याजाची रक्कम वीजबिलामध्ये समायोजित केली जाते, असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे.

दरम्यान, आयोगाकडून करण्यात आलेल्या बहुवार्षिक वीजदराच्या निश्चितीकरणानुसार 1 एप्रिल 2022 पासून नवीन वीजदर लागू करण्यात आले आहे. यामध्ये बहुतांश वर्गवारीचे दर सन 2021-22 मध्ये लागू असलेल्या वीजदराच्या पातळीवरच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे सरसकट वीज दरवाढ झाल्याचा आरोप देखील चुकीचा असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, महावितरणकडून बहुवर्षीय वीजदर विनिमय 2019 नुसार वीजदर ठरवून मिळावेत यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावासंबंधी आयोगाने 30 मार्च 2020 रोजी आर्थिक वर्ष 2020-21 ते आर्थिक वर्ष 2024-25 पर्यंतच्या 5 वर्षांच्या कालावधीसाठी बहुवर्षीय वीजदराचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार महावितरणच्या विविध ग्राहक वर्गवारीसाठी 1 एप्रिल 2020 पासून लागू असणारे वीजदर निश्चित केले आहे.

सध्या 1 एप्रिल 2022 पासून लागू असलेल्या वीजदरानुसार महावितरणकडून वीजबिलांची आकारणी करण्यात येत आहे. यातील बहुतांश वर्गवारीतील वीजदर मागील वर्षीच्या दराच्या पातळीवर ठेवण्यात आल्याने वीजग्राहकांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. यासोबतच सद्यस्थितीत वीज ग्राहकांना नियमित वीजबिलांसह अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. सुरक्षा ठेवीचे बिल हे नियमानुसारच आहे.

विद्युत नियामक आयोगाने विद्युत पुरवठा संहिता, वितरण परवानाधारकांच्या कृतीचे मानके व पॉवर क्वॉलिटी विनिमय 2021 च्या मसुद्यावर हितसंबंधितांकडून तसेच परवानाधारकांकडून सूचना, हरकती, अभिप्राय मागविले होते व ते विचारात घेऊन 25 फेब्रुवारी 2021 रोजी सदर विनिमय जारी केले आहे. त्यातील विनिमय क्र.13 नुसार ग्राहकांची सुरक्षा ठेव सरासरी देयकाच्या दुप्पट तसेच त्रैमासिक बिलिंग असलेल्या ग्राहकांची सुरक्षा ठेव दीडपट करण्याची करण्याची तरतूद विद्युत नियामक आयोगाकडून करण्यात आली आहे.

या तरतूदीनुसार महावितरणकडून वीजग्राहकांना संबंधित आवश्यक सुरक्षा ठेवीमधील रकमेच्या फरकाची स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. तसेच जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवर दरवर्षी स्वतंत्र परिपत्रक काढून व्याज देण्यात येत असते. त्यामुळे सुरक्षा ठेवीची बिल भरून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.