Talegaon News : तळेगाव नगरपरिषदेने काढला कच-यातून उत्पन्नाचा मार्ग

एमपीसी न्यूज – कचरा हा टाकाऊ असतो. टाकून दिलेला कचरा निरुपयोगी असतो, ही रूढ आता जुनी झाली असून कच-यातून कंपोस्ट खत तसेच उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण होतात. हीच संधी ओळखून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने कच-यातून उत्पन्न निर्मितीचा मार्ग काढला आहे. यामुळे केवळ उत्पन्न मिळत नसून ओला आणि सुका कचऱ्याची मोठ्या प्रमाणात योग्य विल्हेवाट लागत असून प्रदूषण, दुर्गंधी, कच-याचे ढीग यापासून मुक्ती देखील मिळत आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत शहरात दैनंदिन निर्माण होणारा घरगुती कचरा नगरपरिषदेच्या एकूण 20 घंटागाड्या मार्फत ओला, सुका व घातक कचरा अश्या पद्धतीने विलगीकरण करून संकलित केला जातो. शहरात दैनदिन निर्माण होणारा एकून कचरा 20 टन असून यामध्ये ओला सुमारे 14 टन तर सुका सुमारे ६ टन एवढा आहे.

कचरा केवळ संचित न करता सुयोग्य नियोजन केल्यास त्यापासून उत्पन्न मिळते. त्यामुळे कचरा डेपोला आग लागल्याने व अन्य मार्गाने होणारे प्रदुषण नियंत्रण, रोजगार निर्मिती, पर्यावरण संवर्धन या बाबी देखील नियंत्रणात आणता येतात. हा विचार घेऊन सद्यस्थितीत तळेगाव दाभाडे नगरपरिषद काम करत आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत मोरखळा कचरा डेपोमध्ये विलगीकरण करून जमा होणाऱ्या ओल्या व सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करणेचे काम अधिक सुनियोजित पद्धतीने सुरु करण्यात आले आहे.

संकलित करण्यात आलेला घनकचरा नगरपरिषदेच्या मोरखळा कंपोस्ट डेपो याठिकाणी टाकला जातो. कचरा डेपोच्या ठिकाणी सुक्या कचऱ्यावर दुय्यम पद्धतीने प्रक्रिया करण्यात येते. सुका कच-यामध्ये काच, पुठ्ठा, प्लास्टिक,रबर, पत्रा, धातू अशा पद्धतीने प्रत्येक घटक वेगळे केले जातात. वेगळा करण्यात आलेले कचरा प्रक्रियेसाठी पाठवण्यात येतो.त्यापासून नगरपरिषदेस उत्पन्न प्राप्त होते. संकलित करण्यात आलेल्या ओल्या कच-यावर त्याच ठिकाणी प्रक्रिया करून उत्तम दर्जाचे कंपोस्ट खत निर्माण करून शहरातील व शहराबाहेरील नागरिकांना 5/- रुपये प्रति किलो या दराने खताची विक्री केली जाते. यामुळे नगरपरिषदेस उत्पन्नाचे साधन निर्माण झाले आहे.

सदर कंपोस्ट खताला MIDC येथील फ्लोरिकल्चर पार्क येथून चांगली मागणी आहे. यासोबतच नगरपरिषदेद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या वृक्षांना देखील हे खत वापरले जाते. या ठीकाणच्या नविन स्क्रीनिंग मशीनमुळे खत निर्मितीचा दर्जा आणि वेगही वाढला असल्याने कंपोस्ट खत निर्मितीला वेग आला आहे.

या वाढत्या खात निर्मितीचा फायदा नगर परिषदेस आर्थिक हातभार लागण्यास होणार असून संचालित केलेल्या कच-यास वेळोवेळी लागणारी आग त्यामुळे सभोवती होणारे प्रदूषण यास निश्चीतच आळा बसेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.