Talegaon News : कलापिनीच्या रंगमंचावर रंगला ‘आमने-सामने’चा दिमाखदार प्रयोग

एमपीसी न्यूज – कलापिनी तळेगाव दाभाडे येथे 17 एप्रिलला “आमने- सामने” या अनेक मनाची पारितोषिके मिळवणाऱ्या नाटकाचा प्रयोग कलापिनी कलामंडळ 2022-23 सदस्यांकरीता शुभारंभाचा प्रयोग महणून नवीन भव्य सुसज्ज डॉ. शं. वा. परांजपे नाट्य संकुलातील रंगमंचावर आयोजित करण्यात आला. या प्रयोगाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे कलाकारांनाही सादरीकरण करताना सादरीकरणाची मजा लुटली.

या व्यावसायिक पण घरगुती चव असलेल्या नाटकात जुनी पिढी व आत्ताची पिढी यांचे लग्नसंस्था या विषयीचे विचार व त्याबाबत त्यांची असलेली परखड मतं याची मांडणी या नाटकाद्वारे अतिशय प्रभावीपणे सादर करण्यात आली. लग्न असो किंवा लिव्ह इन कुठलंही नातं टिकण्यासाठी त्यामध्ये प्रेम असणं गरजेचे आहे, हा विचार नाटकातून मांडण्यात आला.

लीना भागवत, रोहन गुजर, मधुरा देशपांडे, आणि मंगेशजी कदम या चारही लोकप्रिय कलाकारांचा सहज सुंदर अभिनय पाहायला मिळाला. त्यांचा रंगमंचावरचा सहज वावर प्रेक्षकांना सुखावून गेला. विनोद निर्मितीतल्या सहजतेमुळे सर्व विनोदांना उत्स्फूर्त दाद मिळत होती आणि नाटक रंगत गेले. नाटकाचे नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत, लेखन,उत्तम टीम वर्क आणि सादरीकरण एकमेकांना पूरक आणि रंगत वाढविणारे होते.

यापुढेही असेच सुंदर नाट्यप्रयोग आम्ही कलापिनी करीता सादर करण्याचा नक्की प्रयत्न करू असे आश्वासन लीना भागवत व मंगेश कदम यांनी दिले व इथे कला सादर करताना आम्हां कलाकारांना विशेष आनंद मिळतो अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

यावेळी डॉ. अनंत परांजपे, अंजली सहस्त्रबुद्धे, चेतन शहा, हेमंत झेंडे, संजय मालकर, रामचंद्र रानडे, श्रीशैल गद्रे ,श्रीपाद बुरसे,अनघा बुरसे, अशोक बकरे, रवींद्र पांढरे, रश्मी पांढरे आदी उपस्थित होते. ध्वनी संयोजन सुमेर नंदेशवर यांनी केले. विराज सवाई, वेदांग महाजन, सोहम पवार, संदीप मन्वरे आणि सहकाऱ्यांनी कार्यक्रमाची तयारी केली होती. कलापिनीची यावर्षीची सभासद नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहतरी जास्तीत जास्त लोकांनी सभासद होवून उत्तमोत्तम कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन कलामंडळ प्रमुखांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.