AFC Women’s Asian Cup : चीनचा इराणविरुद्ध दणकेबाज विजय

एमपीसी न्यूज –  आठव्या वेळीसुद्धा विजेत्या बलाढ्य चीनने एएफसी वुमन्स आशिया कप भारत 2022 स्पर्धेत आपली विजयी वाटचाल कायम राखताना इराण संघाचा 7-0 गोलने धुव्वा उडवला. अंधेरी येथील मुंबई फुटबॉल अरेना स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात चीनने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवत प्रतिस्पर्धी संघांना धोक्याचा इशारा दिला.

वाँग शाँगने पुन्हा एकदा आपला दर्जेदार खेळ सादर करताना संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. वाँग शाँग आणि वाँग शानशान यांच्या शानदार खेळाच्या जोरावर संभाव्य विजेते असलेल्या चीनने दिमाखात बाद फेरीतील स्थान निश्चित केले. चीनविरुद्धच्या या पराभवानंतर बाद फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी इराणला बुधवारी चायनिज तैपईविरुद्ध विजय अनिवार्य झाला आहे. तैपईलाही पुढील फेरीसाठी विजय आवश्यक असल्याने दोन्ही संघांसाठी हा सामना निर्णायक ठरणार आहे. गुरुवारी चीनला तैपईविरुद्ध 4-0 गोल असा विजय मिळवताना काहीसे झुंजावे लागले, मात्र रविवारी त्यांनी पुन्हा एकदा वेगवान आणि नियंत्रित खेळ करताना इराणचा भक्कम बचाव भेदत शानदार पुनरागमन केले.

दहाव्याच मिनिटाला वाँग शाँगने मारलेली किक इराणची गोलकीपर झोहरेह कौदैईने यशस्वीपणे रोखला. यानंतर इराणच्या या स्टार गोलकीपरने पाचच मिनिटांनी पुन्हा एकदा चीनच्या कर्णधाराला गोल करण्यापासून रोखले. तिने भारताविरुद्ध केलेला भक्कम बचाव चीनविरुद्धही कायम राखत प्रभावी कामगिरी केली.

त्यामुळेच इराणच्या या गोलकीपरचा बचाव भेदण्यासाठी चीनला वेगळी योजना आखावी लागली आणि ही विशेष कामगिरी केली ती वाँग शाँगने. तिने 28व्या मिनिटाला डाव्या पायाने चेंडू जाळ्याच्या अचूक वेध घेत मारून अप्रतिम गोल केला. यासह शाँगने दिमाखात आपल्या 27व्या वाढदिवसाचा जल्लोष केला. या गोलनंतर इराणने विचलित न होता पुन्हा एकदा भक्कम बचाव करत चीनला गोलजाळ्यापासून दूर राखण्याचा प्रयत्न केला. मात्र, चीनच्या वेगवान आणि आक्रमक खेळापुढे मध्यंतराच्या काही मिनिटांआधीच इराणला दुसरा गोल स्वीकारावा लागला. झिआओ युयी हिने 43व्या मिनीटाला गोल करत चीनला मध्यंतराला 2-0 गोल असे आघाडीवर नेले.

इराणने मध्यंतरानंतर नेगिन झंडी या आपल्या गुणवान युवा खेळाडूला मैदानात उतरविले. मात्र, काही मिनिटांनीच मेलिका मोटेवलीने चीनच्या ली मेंगवेनला फाऊल केले आणि इराणला पेनल्टीला सामोरे जावे लागले. या नामी संधीचा फायदा घेत वाँग शाँगने सहजपणे गोलकीपर कौदेईचा बचाव भेदला आणि 49व्या मिनिटाला चीनची आघाडी 3-0 गोल अशी केली.

चीनच्या वर्चस्वानंतर सुरुवातीला सामन्यात जी चुरस पाहण्यास मिळाली होती, ती काहीशी लुप्त झाली होती. चीनची ही आघाडी पुढे नेली ती वाँग शानशानने. तिने 55व्या मिनिटाला झिआओ युयीकडून मिळालेल्या पासवर गोल केला. यानंतर चार मिनिटांनी पुन्हा एकदा या जोडीने अप्रतिम चाल रचत संघाचा पाचवा गोल नोंदवला. शानशानने पाठोपाठ दोन गोल नोंदवत इराणच्या आव्हानातली हवाच काढली.

दुसऱ्या सत्रात चीनच्या खेळाडूंची तंदुरुस्ती आणि खेळातील तंत्र दिसून आले. या तंत्रशुद्ध खेळाच्या जोरावर चीनने 77व्या मिनिटाला सहावा गोल केला. टँग जिआलीने बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरल्यानंतर केवळ 15 मिनिटांनीच गोल करत संघाला 6-0 गोल असे आघाडीवर नेले. चीनच्या आक्रमक खेळा पुढे इरानच्या खेळाडू दडपनाखाली आल्या. 82 व्या मिनिटाला चीनच्या वॉँग शॉँगने हेडरने संघाचा सातवा गोल केला. चीन संघाने 7-0 गोलची आघाडी अखेरपर्यंत कायम राखत दिमाखात आगेकूच केली.

चीनने या स्पर्धेवर एकहाती दबदबा राखताना 1986 ते 1999 दरम्यान सलग सात विजेतेपद पटकावली आहेत. पण 2006 साली ऑस्ट्रेलिया येथे आठवे जेतेपद पटकावल्यानंतर चीनला एकदाही या स्पधेचे विजेतेपद उंचावता आलेले नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.