Alandi : अलंकापुरीतील ‘त्या’ प्रकरणावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

एमपीसी न्यूज – अलंकापुरी आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या (Alandi ) पालखी प्रस्थानावेळी वारकरी आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. त्यावरून राज्यभर विविध स्तरातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

नेमकं काय घडलं?
रविवारी ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे होणार होते. माउलींच्या मंदिरात मागील वर्षी गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली होती. तसे प्रकार टाळण्यासाठी यावर्षी प्रशासनाने मानाच्या दिंड्यांमधील प्रत्येकी 75 वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी पिंपरी-चिंचवड पोलीस करीत होते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर अचानक काही वारकरी आले. त्यांनी मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पोलिसांनी विरोध केला असता वारकऱ्यांनी पोलिसांना ढकलून आत जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांना पांगवले.

दरम्यान, पोलिसांनी काठ्या उगारून वारकऱ्यांना पांगवले असल्याचा एक व्हिडीओ समोर आला. त्यावरून पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केला असल्याचे आरोप होऊ लागले. सोमवारी सकाळी आणखी एक व्हिडीओ समोर आला असून वारकरी पोलिसांना ढकलून पोलिसांना तुडवून आत जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे व्हिडीओ मध्ये चित्रित झाले आहे.

कोण काय म्हणाले –

देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री)
गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त ढगे पाटील आणि सर्व मानाच्या दिंडीचे प्रमुख यांची एक बैठक झाली. गेल्यावर्षीसारखी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून सर्वानुमते निर्णय घेण्यात आला की प्रत्येक मानाच्या दिंडीला 75 पासेस देण्यात याव्यात. त्यानुसार संपूर्ण नियोजन करण्यात आले. मात्र काही स्थानिक (Alandi ) तरुणांनी मध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे थोडी झटापट झाली. आळंदी येथे कोणताही लाठीचार्ज झालेला नाही, त्यामुळे न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका. आपल्यासाठी वारकऱ्यांची सुरक्षा सर्वाधिक महत्वाची आहे.

अजित पवार (विरोधी पक्षनेते, विधानसभा)
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीं पालखीच्या आळंदीहून प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलीस लाठीमाराची घटना क्लेषदायक आहे. महाराष्ट्राच्या संत, भक्तीपरंपरेचं वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या इतिहासात असं यापूर्वी घडलं नव्हतं. ही घटना मनाला दु:ख देणारी आहे. सोहळ्याचं योग्य नियोजन करुन हा प्रसंग टाळता आला असता, परंतु तसं घडलं नाही. वारकऱ्यांवरील पोलीस लाठीमाराचा आणि लाठीमार करणाऱ्या सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.

विनयकुमार चौबे (पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड)
गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत तीन वेळा बैठका घेऊन गेल्यावर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी 75 जणांना प्रवेश देण्याचा निर्णय पूर्वीच घेतला होता. त्यानुसार तसे नियोजन देखील करण्यात आले. मानाच्या दिंडीप्रमुखांनी हा निर्णय मान्य केला होता. त्यानुसार पासेस वितरित केले होते. मुख्य म्हणजे सर्व मानाच्या दिंडीतील प्रत्येकी 75 जणांनाच पाठवित (Alandi ) होते. मात्र आज अचानक काही स्थानिक युवकांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मंदिर विश्वस्त आणि चोपदार सुद्धा त्यांना समजावण्यासाठी आले. पण ते युवक ऐकत नव्हते. बॅरिकेड तोडून त्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या स्थानिकांशी केवळ किरकोळ झटापट झाली, पोलिसांनी लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केला नाही.

ॲड. विकास ढगे-पाटील (पालखी सोहळाप्रमुख, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी, आळंदी)
प्रस्थान सोहळ्यावेळी झालेल्या प्रकाराबाबत माहिती घेण्याचे काम सुरु आहे. सोहळ्याला गालबोट लावण्याच्या अनुषंगाने कोणी जाणीवपूर्वक तर काही करत नाही ना? याबाबतची खातरजमा केली जात आहे. मुख्य मंदिराच्या आवाराच्या बाहेर हा प्रकार घडला आहे. त्याचा पालखी सोहळ्यावर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही. पालखीचे प्रस्थान आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात झाले आहे.

रविराज काळे (आप युवक शहराध्यक्ष, पिंपरी-चिंचवड)
आळंदीहून पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होत असताना वारकऱ्यांना पोलिसांनी लाठीमार केला. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आम आदमी पार्टीकडून याचा तीव्र शब्दात निषेध. यासंदर्भात शिंदे फडवणीस सरकारने वारकऱ्यांची माफी मागावी.

विशाल रावसाहेब पाटील (विद्यार्थी वारकरी, जोग महाराज संस्था, आळंदी)
आमचं म्हणणं होतं की, आम्हाला प्रस्थान सोहळ्याला सोडा. ते दरवर्षी सोडतात. पण अचानक ठरलं की आम्हाला आत सोडायचं नाही. आम्हा चार विद्यार्थ्यांना वीस पोलिसांनी मारहाण केली. एकांतात घरात नेऊन मारलं आहे. आमच्यावर हात उचलला. भविष्यात इतर वारकऱ्यांवर हात उचलू शकतात. पोलिसांनी मारहाण का केली, या प्रश्नाचे उत्तर (Alandi ) त्यांनी द्यावं.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.