Pune News : ‘आम्ही पुणेकर’ संस्थेतर्फे काश्मीरमधील शेतक-यांसाठी महाराष्ट्राचा अभ्यास दौरा

एमपीसी न्यूज – जम्मू-काश्मीरमधील दुग्ध व डेअरी व्यवसायाशी निगडीत असलेल्या प्रगतीशील शेतक-यांकरीता ‘आम्ही पुणेकर’ संस्थेतर्फे महाराष्ट्रात अभ्यास दौ-याचे आयोजन करण्यात आले. पुण्यातील कृषी महाविद्यालय, वाकड येथील गोशाळा, इंदापूर येथील सोनाई दूध व डेअरी प्रकल्प, निंबोडी-इंदापूर ग्रामपंचायत, बारामती व भवानीनगर साखर कारखाना, गोकुळ डेअरी प्रकल्प कोल्हापूर यांसह राज्यात विविध ठिकाणी या शेतक-यांनी भेट देत दुग्ध व डेअरी व्यवसायाशी निगडीत विविध गोष्टी जाणून घेतल्या.

जम्मू-काश्मीर सरकारच्या पशुसंवर्धन खात्यांतर्गत दुग्ध व डेअरी व्यवसायाशी निगडीत शेतक-यांकरीता क्षमता विकास कार्यक्रमांतर्गत व आम्ही पुणेकर संस्थेच्या पुढाकाराने महाराष्ट्र दौ-याचे आयोजन करण्यात आले होते. जम्मू-काश्मीर पशुसंवर्धन खात्याचे संचालक डॉ.सागर डोईफोडे यांच्या प्रयत्नातून व पुण्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांच्या सहकार्याने हा दौरा राबविण्यात आला. आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव व सचिव प्रणव पवार यांनी दौ-याचे नियोजन केले.

किश्तवाड येथील बिपन लाल शर्मा, रामबान येथील मोहम्मद सादिक, जम्मू येथील राम मूर्ती, सुखदेव राज व एस. सुरजीत सिंग हे शेतकरी पुण्यात दौ-याकरीता आले होते. जम्मू पशुसंवर्धन विभागाचे तांत्रिक अधिकारी डॉ. शाबाद हुसेन, जनसंपर्क अधिकारी डॉ. संदीप कुमार यांनी देखील दौ-याकरीता सहाय्य केले.

डॉ.सागर डोईफोडे म्हणाले, महाराष्ट्रात दुग्ध व डेअरी व्यवसायाशी निगडीत आधुनिक गोष्टी व तंत्रज्ञान शिकून जम्मू-काश्मीरमध्ये त्याचा अवलंब व्हावा, याकरीता हा दौरा आयोजिण्यात आला. जम्मू-काश्मीरपेक्षा महाराष्ट्रात खूप मोठे कंपनी प्लांट्स आहेत. नवीन तंत्रज्ञान देखील आहे. असेच तंत्रज्ञान काश्मीरमध्ये व आजूबाजूच्या भागात विकसित झाले, तर तेथील विकास होईल.

हेमंत जाधव म्हणाले, आपल्याकडील आधुनिक तंत्रज्ञान, शेतीविषयक आधुनिक गोष्टी जम्मू-काश्मिरमधील शेतक-यांना पाहता याव्यात, यासाठी या दौ-याचे आयोजन करण्यात आले होते. हा दौरा अभ्यासपूर्ण झाला असून भविष्यात त्याचा नक्कीच फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले. शेतक-यांनी देखील आपले अनुभव व भावना यावेळी व्यक्त केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.